रेशन कार्डधारकांची कोंडी; शिवसेनेने विचारला जाब, शिधावाटप अधिकारी जनजागृती करणार
रेशन कार्डवरील धान्यपुरवठा बंद होणे, विविध शासकीय सवलती न मिळणे तसेच ई-रेशन कार्ड काढताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त आहेत. या समस्याबाबत नागरिकांना योग्य माहिती मिळावी आणि रेशन कार्डसंर्भातील नियम व प्रक्रियेची जनजागृती व्हावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) डोंबिवली पश्चिम शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विष्णूगर येथील मुख्य शिधावाटप अधिकारांची भेट घेत त्यांना जाब विचारला. या दणक्यानंतर ताळ्यावर आलेल्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
रेशन कार्डसंर्भातील नवीन नियम, बदल आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रे, बॅनर, मोबाईल संदेश, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाचा वापर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मुख्य शिधावाटप अधिकारी हर्षा परांजपे यांच्याकडे केली.
नवीन ई-रेशन कार्ड देणार
रेशन कार्डवरील पत्ता किंवा नाव बदलायचे असल्यास नागरिकांना नवीन ई-रेशन कार्ड देण्यात येणार असून सध्या त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शहरप्रमुख सुरेश परदेशी, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, राहुल चौधरी, राजू पवार, सल्लागार तुकाराम सुरकुंडे, विभागप्रमुख शेखर चव्हाण, अनिल मुथा, उपविभागप्रमुख सुधाकर जाधव, अंकुश सूर्यवंशी, महिला शहर संघटक प्रियांका विचारे, महिला शहर संघटक कविता भगत, शाखाप्रमुख हेमंत गिमावरकर, योगेश कुबल, अनिल विश्वकर्मा आदी उपस्थित होते.
Comments are closed.