रत्नागिरीत भीषण तिहेरी हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग; प्रेम, संशय आणि गुन्ह्यांच्या मालिकेने खळब

रत्नागीरी गुन्हा: रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच उघडकीस आलेल्या तिहेरी खून प्रकरणाने जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार दुर्वास पाटील याच्यासह तिघा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाई सुरू आहे. रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाला सुरुवात केली असून प्रत्येक धागा जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नेमकं प्रकरण काय?

रत्नागिरीत उघडकीस आलेल्या प्रकरणात दुर्वास पाटील या तरुणाने सलग तीन खून केल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला सायली बारमध्ये काम करणाऱ्या सिताराम किरला मारहाण करून ठार करण्यात आलं. त्यानंतर या घटनेबद्दल माहिती असलेल्या राकेश जंगम याचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकण्यात आला. अखेरीस प्रेमसंबंधातून गरोदर झालेल्या भक्ती मयेकर हिचाही 16 ऑगस्ट रोजी गळा आवळून खून करून तिचा मृतदेहही आंबा घाटात टाकण्यात आला. या तिन्ही खुनांमागे मुख्य आरोपी दुर्वास पाटील असून त्याला मदत करणारे साथीदार आणि त्याचा वडील दर्शन पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सायली बार सील, मोबाईल जप्त

तपासाचा धागा सायली बारपर्यंत पोहोचला आहे. दोन खून याच ठिकाणी झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आहे. सील करण्यात आलेल्या बारमधूनच मृतक भक्ती मयेकर हिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि चॅटिंग पोलिसांसाठी महत्वाचे पुरावे ठरू शकतात. सीडीआर तपासून आरोपींच्या संपर्क जाळ्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुर्वासच्या वडिलांची चौकशी

या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे दुर्वास पाटीलचा वडील दर्शन पाटील याचाही यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायली बार तोच चालवत असल्याने आणि काही जुन्या गुन्ह्यांशी त्याचा संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे दर्शन पाटीललाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून या धाग्यावर पोलीस काटेकोर तपास करत आहेत.

जुन्या खुनांचे गूढ उलगडले

भक्तीच्या खुनानंतर पोलिस तपासात आणखी दोन खून प्रकरणे उघड झाली आहेत. सिताराम किर या तरुणाला झालेली मारहाण व त्यानंतरचा मृत्यू आणि राकेश जंगम या तरुणाचा आंबा घाटात टाकलेला मृतदेह, या दोन्ही घटनांमध्ये दुर्वास पाटीलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे आरोपीवर आधीपासूनच गंभीर आरोपांची मालिका जमा झाली आहे.

प्रेमसंबंधातून हत्या

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, भक्ती मयेकर ही गरोदर होती आणि लग्नाचा तगादा लावत होती. या गोष्टीमुळे अडचणीत आलेल्या दुर्वासने साथीदारांच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह साखरपाजवळील आंबा घाटात टाकण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे 26 वर्षीय भक्ती मयेकर हिचा गळा आवळून खून करण्यात आला. सायली बारमधील वरच्या रूममध्ये केबलने हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.याआधी बारमध्ये काम करणाऱ्या सिताराम किर याला, तो भक्तीशी फोनवर बोलतो या संशयातून आरोपी दुर्वास पाटीलने बेदम मारहाण केली होती. गंभीर दुखापतीनंतर घरी पाठवले असता त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती 28 वर्षीय राकेश जंगम याला होती. सत्य उघड होऊ नये म्हणून त्याचाही खून करून मृतदेह आंबा घाटात फेकण्यात आला. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार गेल्या वर्षीच जयगड पोलिसात दाखल झाली होती.

आणखी वाचा

Comments are closed.