काय चाललंय सरकारमध्ये? अधिकाऱ्यानेच अधिकाऱ्याकडून घेतली लाच! लाचखोर अधिकारी, कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयालयातील सहाय्यक संचालक, सहायक लेखाधिकारी आणि कंत्राटी शिपाई यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. दापोली पंचायत समिती कार्यालयाचे २०२० ते २०२१ आणि २०२१ ते २०२२ या वर्षातील लेखापरिक्षणातील प्रलंबित १५ मुद्दे वगळून अहवाल देण्याकरिता १६ हजार ५०० रूपयांची लाच घेताना स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे.
सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालय रत्नागिरी यांच्या मार्फत पंचायत समिती दापोलीच्या कार्यालयाचे लेखापरीक्षण करण्यात येते. त्यानुसार सन २०२० ते २०२१ व २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण अहवालामध्ये प्रलंबित असलेल्या २१ मुद्द्यांची पूर्तता करून तसा अनुपाल अहवाल ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय रत्नागिरी यांना सादर करण्यात आला होता. स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी कंत्राटी शिपाई सतेज घवाळी व सहाय्यक संचालक शरद जाधव यांची तक्रारदार यांनी भेट घेतली असता अनुपालन अहवालानुसार पूर्तता केलेले २१ मुद्दे वगळून त्याप्रमाणे परिच्छेद वगळले बाबतचा अंतिम अहवाल (एफआर) देण्याकरिता सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्यासाठी सतेज घवळी यांनी तक्रारदाराकडे २४ हजारांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी दिनांक ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने सत्यता पडताळणी कारवाई दरम्यान लेखा परीक्षण अहवाला मधील प्रलंबित असलेल्या २१ मुद्द्यापैकी १५ मुद्दे वगळून तसा अहवाल देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडून १६ हजार ५०० रूपयांची लाच रक्कम सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांने स्वीकारून ती लाच रक्कम सहाय्यक लेखाधिकारी सिद्धार्थ विजय शेटये यांच्याकडे दिल्यानंतर स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक शरद जाधव,सहायक लेखाधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Comments are closed.