MPL 2025: आव्हान जिवंत ठेवण्याचेच रत्नागिरी आणि रायगडसमोर आव्हान, सकाळच्या सत्रात होणार 'कोकण डर्बी'

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (10 जून) तीन सामने खेळले जाणार आहेत. दिवसातील पहिल्याच सामन्यात कोकणातील दोन संघ रत्नागिरी जेट्स व रायगड रॉयल्स एकमेकांसमोर ठाकतील. स्पर्धेत आत्तापर्यंत फारशी समाधानकारक कामगिरी करू न शकलेल्या या संघांमध्ये दोन गुणांसाठी मोठी रस्सीखेच होईल.

एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद पटकावलेल्या रत्नागिरी जेट्स संघासाठी एमपीएल 2025 ची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिलेली. आपल्या पहिल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव पत्करावे लागले. त्यानंतर चौथ्या सामन्यात सातारा वॉरियर्सला हरवत त्यांनी आपल्या गुणांचे खाते उघडले. दुसरीकडे रायगड रॉयल्स संघाची सुरुवात दणदणीत विजयाने झालेली. मात्र, त्यानंतर सलग दोन सामन्यात त्यांना लाजिरवाणे पराभव पत्करावे लागले.

गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या रत्नागिरी संघाची मदार त्यांच्या अनुभवी खेळाडूंवर असणार आहे. कर्णधार अझीम काझी हा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात झोकून देऊन कामगिरी करताना दिसतोय. गोलंदाजीत प्रदीप दाढे त्याची मदत करतोय. विजय पावले व सत्यजित बच्छाव या गोलंदाजांचे अपयश संघाच्या पराभवास कारण ठरतेय. तर, फलंदाजीत कर्णधार काझी व्यतिरिक्त कोणालाही सातत्य दाखवता आले नाही.‌ अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर याने फलंदाजीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली असली तरी, गोलंदाजी त्याला अपयश येताना दिसते.

सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रायगडसाठी कर्णधार ऋषभ राठोड हा एकटाच शिलेदार दिसून येतोय. अनुभवी सिद्धेश वीर व युवा दिग्विजय पाटील ‌यांचे फलंदाजीतील अपयश ठळकपणे उठून दिसतेय. विकी ओस्तवाल व हितेश वाळुंज दोन्ही अनुभवी फिरकीपटूंना आपली छाप पडता आलेली नाही. वेगवान गोलंदाज तनय संघवी,‌ निखिल कदम व सागर जाधव ‌हे नियमित अंतराने बळी घेण्यात अपयशी ठरलेले दिसतात.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. असे असले तरी फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी मदत करेल.‌ हा सामना सकाळी ‌9.30 मिनिटांनी सुरू होईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

रत्नागिरी जेट्स- धीरज फटांगरे, जोय परदेशी, अझीम काझी, किरण चोरमले, दिव्यांग हिंगणेकर, अभिषेक पवार, साहिल चुरी, सत्यजित बच्छाव, प्रथमेश गावडे, प्रदीप दाढे, मनोज यादव

रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, हर्ष मोगावीरा, दिग्विजय पाटील, ऋषभ राठोड, ऋग्वेद मोरे, हर्ष संघवी, तनय संघवी, अजय बोरुडे, विकी ओस्तवाल, हितेश वाळुंज, निखिल कदम

Comments are closed.