Ratnagiri News – देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला  रत्नागिरीतील मंदिरांचा तीव्र विरोध, कायदा मागे घेण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ हा कायदा राज्यातील हजारो हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत मुळापासून उखडून टाकणारा आहे. या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून, तो हिंदु धर्माच्या धार्मिक व मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा असल्याने या कायद्याला रत्नागिरीतील मंदिरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रस्तावित कायदा मागे घेण्याची मागणी  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील विविध मंदिरांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या नावे प्रशासकीय स्तरावर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या कार्यालयात एकूण ९६ निवेदने या संदर्भात देण्यात आली आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून आणि छत्रपती शिवरायांच्या काळापासून अनेक राजांनी देवस्थानांच्या दैनंदिन धार्मिक विधींसाठी, अन्नछत्रांसाठी आणि रुढी-परंपरा जोपासण्यासाठी जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत. कायद्यानुसार देवस्थानची ‘मूर्ती’ ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’  मानली जाते आणि या जमिनींची मालकी त्या देवतेकडे असते. मात्र, प्रस्तावित कायद्याच्या कलम ३ आणि ४ नुसार, ही सर्व इनामे एका झटक्यात रद्द करून, त्या जमिनी हस्तांतरित करण्याचा घाट घातला जात आहे.

यामुळे पिढ्यानपिढ्या मंदिरांच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचे व्यापारीकरण होईल आणि भविष्यात ही मंदिरे परावलंबी होतील, अशी भीती निर्माण झाली आहे.निवेदन देते वेळी  संतोष सावंत, मनोहर मोरे, अंकेत कीर, बळीराम कीर, मानस देसाई, माधव आपटे, मंगेश राऊत, महेश कात्रे, गणेश गायकवाड, अरविंद बारस्कर, शशिकांत जाधव, गोविंद भारद्वाज आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी आदी उपस्थित होते.

रत्नागिरीतील प्रसिद्ध ग्रामदेवता म्हणजे श्री देव भैरी देवस्थान, श्री विठ्ठल मंदिर (बाजारपेठ), श्री भगवती मंदिर (किल्ला), श्री परशुराम मंदिर (परतवणे), श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (कुवारबाव), श्री दत्त मंदिर (खळची आळी), श्री देव सांब महालक्ष्मी मंदिर आणि श्री विठ्ठल मर्मभेदी मंदिर. मंदिर (खेडशी), मिरजोळेची ग्रामदेवता श्री कालिका मंदिर, श्री कृष्ण मंदिर, श्री साई साई मंदिर. श्री आदित्यनाथ मंदिर (नेवरे), श्री लक्ष्मीकांत देवालय (केली), कोतवडे येथील 7 सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट मंदिरे आदी विविध मंदिरांच्या वतीने निवेदने देण्यात आली आहेत.

Comments are closed.