मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असतानाच हातिवले टोलनाका सुरू करण्याचा डाव; स्थानिकांना टोलमाफी करा! सर्वपक्षीय पदाधिकारी रस्त्यावर उतरले
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आज राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल सुरू करण्यास विरोध केला. गुरुवारी राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. राजापूर तालुक्यातील नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना हातिवले टोल नाक्यावर निवेदन देण्यात आले.
सकाळपासूनच राजापूर तालुक्याच्या विविध भागातून नागरिक, वाहन चालक, शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी हातिवले येथे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मुंबई–गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची शासनामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
कोकणवासीयांच्या माथी निकृष्ट दर्जाचा रस्ता मारून आता त्यांच्याकडून टोल वसुली करून पिळवणूक करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत उपस्थितांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे यापूर्वीही हातिवले टोल दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला होता.
मुंबई–गोवा महामार्गावरील अनेक कामे अद्याप प्रलंबित आहेत. राजापूर एस.टी. डेपो समोरील महामार्गाचे काम अपूर्ण असून येथे वारंवार अपघात होत आहेत. भू-संपादन झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणारे मार्ग बंद झाले असून त्यांना पर्यायी रस्ते उपलब्ध नाहीत. सर्विस रोड, बस स्टॉप, पिकअप शेड यांसारखी कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. महामार्गालगत वृक्ष लागवड झालेली नाही. मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहन चालकांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. तसेच महामार्गावर अपघात झाल्यास रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
हातिवले टोल मार्गावरून राजापूर शहरात ग्रामस्थांना दैनंदिन कामासाठी वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय कार्यालये, बँका, पोस्ट तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी ग्रामस्थांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
Comments are closed.