Ratnagiri News – धामणवणेतील निवृत्त शिक्षिकेच्या हत्येचा अखेर उलगडा; ओळखीच्या तरुणानेच दागिन्यांसाठी संपवलं
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे झालेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (68) यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. चिपळूण पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणाने दागिने आणि पैशांसाठी वर्षा यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
जयेश गोंधळेकर हा मूळ गोंधळे गावचा असून, जोशी यांच्या ओळखीतील होता. जयेश सध्या बेरोजगार होता. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यानेच ही हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. घराचा दरवाजा तोडलेला नव्हता, आतूनच उघडण्यात आला होता. यामुळे सुरुवातीपासूनच ओळखीच्या व्यक्तीकडूनच गुन्हा घडल्याचा पोलिसांचा अंदाज होता. पोलिसांचा हा अंदाज खरा ठरला आणि गुरुवारी सकाळी या घटनेचा उलगडा झाला.
आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी कॉम्प्युटर हार्डडिस्कही गायब केल्याचे आढळले. वर्षा जोशी या दाभोळ (ता. दापोली) येथील महाकाळ कुटुंबातील असून, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या धामणवणे येथे एकट्याच राहत होत्या. काही दिवसांत हैदराबादला जाण्याचा त्यांचा मानस होता. मैत्रिणीचा संपर्क न झाल्याने संशय निर्माण झाला. मैत्रिणीने एका तरुणाला चौकशीसाठी पाठविल्यानंतर घटनेचा उलगडा झाला.
Comments are closed.