Ratnagiri News – राजापूर शहरात लोखंडी कोयता घेऊन संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्यावर कारवाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजापूर शहरात संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका व्यक्तीला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार लोखंडी कोयता जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी, १४ जुलै रोजी रात्री ७.१५ च्या सुमारास राजापूर हायस्कूल आणि गोडेदाते कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनियर कॉलेज समोरील रस्त्यावर करण्यात आली. या प्रकरणी श्रीकांत भगवान तांबे (वय ५१, रा. रामू, राजापूर) याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना श्रीकांत तांबे हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याची कसून तपासणी केली असता, त्याच्याकडे १७ इंच लांबीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. या कोयत्याचा आकार अर्धचंद्राकृती असून त्याचे पुढचे टोक तुटलेले होते आणि पात्यावर माती लागलेली होती. या शस्त्राबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, आरोपीला कोणताही समाधानकारक खुलासा करता आला नाही.

सदर शस्त्र त्याने कुठूनतरी चोरून किंवा लबाडीने मिळवले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई वैष्णवी विष्णू कांबळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी १०० रुपये किमतीचा हा धारदार कोयता जप्त केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे शहरात सतर्कता वाढली आहे.

Comments are closed.