Ratnagiri News – संगमेश्वर कोल्हापूर राज्यमार्गावरून जाणाऱ्या ट्रकमुळे विद्युत वायर तुटली; महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
संगमेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वीजपुरवठा खंडित होत असताना महावितरणचे कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. अशातच लोवले गावात अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील वाहनामुळे एलटी लाईनची वायर तुटून रस्त्यावर पडल्याची घटना घडली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवणे गावातील वीज खांब पडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी जात होते. त्यावेळी लोवले गावातून जात असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनावरील छोट्या वाहनाचा धक्का लागून एलटी लाईनची वायर तुटली व ती रस्त्यावर पडली. वायर चालू स्थितीत असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच महावितरणचे कर्मचारी रवींद्र कदम (लाईनमन), किशोर लाड, अंकेश गेल्ये, किरण मोरे व ओंकार कळंबटे यांनी तत्काळ वीजपुरवठा खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यानंतर अवघ्या एका तासात तुटलेली वायर दुरुस्त करून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर संबंधित कर्मचारी पुन्हा शिवणे येथे जाऊन दुरुस्तीच्या कामाला लागले. अचानक तुटलेल्या वायरमुळे निर्माण झालेला संभाव्य धोका टाळण्यात महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
Comments are closed.