Ratnagiri News – दापोलीत विहिरीत पडलेल्या भेकराला जीवदान; वनविभागाच्या तत्परतेने वाचले प्राण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली तालुक्यातील खेर्डी माळवाडी येथे विहिरीत पडलेल्या भेकराला (बार्किंग डिअर) वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. जखमी अवस्थेतील या दुर्मिळ वन्यजीवाला सुरक्षित बाहेर काढून पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या विहिरीत भेकर पडल्याची माहिती मंगळवारी वन विभागाला दिली. त्यानंतर दापोली वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भेकराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तपासणीदरम्यान विहिरीतील खडकावर पडल्यामुळे त्याचा समोरील उजवा पाय गुडघ्याजवळून मोडल्याचे आढळून आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर भेकराला विशेष वाहनाद्वारे तातडीने पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे रेस्क्यू ऑपरेशन वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे आणि वन्यजीव प्रेमी किरण करमरकर यांनी वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने पार पाडले. विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Comments are closed.