Ratnagiri News – चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसची धडक; २१ जण जखमी
चिपळूण-धामणंद मार्गावरील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ शनिवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात २१ जण जखमी झाले. यामध्ये १८ प्रवासी, दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. जखमींना तातडीने कामथे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.यातील काही प्रवाशांना उपचारानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आले, तर काहींवर उशिरापर्यंत उपचार सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चिपळूणहून चोरवणेकडे जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणच्या दिशेने येणारी एसटी बस खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळील वळणावर समोरासमोर धडकल्या. दोन्ही बसची धडक जोरदार असल्याने बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली. या अपघातात काही प्रवाशांच्या डोक्याला, जबड्याला आणि हनुवटीला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. काही प्रवाशांचे दातही पडल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.
या मार्गावरील तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस तपासानंतरच त्याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. खांदाटपाली, आंबडस आणि चिरणी परिसरातील ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण आगाराचे आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के व त्यांचे सहकारी तसेच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला होता.दोन्ही एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आल्यानंतर अपघातग्रस्त बस हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.अपघातातील जखमींना कामथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथेही गर्दी झाली होती. सायंकाळी चार वाजल्यानंतर अपघातग्रस्त बस हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
सायंकाळी चार वाजल्यानंतर जखमी प्रवाशांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. एसटीचे अधिकारीही रुग्णालयात उपस्थित राहून जखमी प्रवाशांच्या उपचाराची माहिती घेत होते.या अपघातामुळे चिपळूण-धामणंद मार्गावरील धोकादायक वळणे आणि तीव्र उतारांच्या ठिकाणी वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत चिपळूण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments are closed.