Ratnagiri News – आंबा-काजू नुकसानीचे पंचनामे तातडीने करा; 20 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली असून नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १,५६,९६० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्राचे अचूक मूल्यमापन करून २० मे २०२६ पर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.

१३ मे २०२६ रोजी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करायचा आहे. ​नुकसानीचे मूल्यमापन पारदर्शक आणि अचूक व्हावे यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांमार्फत ग्रामस्तरावर संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असून ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.

​जिल्ह्यातील कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी १९ मे २०२६ पर्यंत आपल्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.
च्या
आवश्यक कागदपत्रांमध्ये ​Agristack फार्मर ID, ​आधार कार्ड छायांकित प्रत (झेरॉक्स),​७/१२ उतारा, ​बँक पासबुक छायांकित प्रत (झेरॉक्स)​ यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप व्यापक असल्याने प्रशासनाकडून हे काम अत्यंत वेगाने पूर्ण केले जात आहे. विहित मुदतीत कागदपत्रे जमा करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.