Ratnagiri News – माभळे गावात भीतीचे सावट, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे घरांना तडे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे माभळे गावातील नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान करण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे गावातील काही घरांना तडे गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

सदर मार्गाचे काम तब्बल 17 वर्षे रखडले होते. सोनवी पुलासह रखडलेली कामे आता वेगाने सुरू झाली असली तरी कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गणेश हॉटेल ते पुनर्वसन परिसरादरम्यान डोंगर उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या घरांवर होत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. हर्षदा डिंगणकर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई करण्यात येत असून ही खोदाई निर्धारित हद्दीबाहेर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यामुळे त्यांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत. तसेच उज्वला खापरे आणि घडशी कुटुंबीयांच्या घरांकडे जाणारा मार्गही बंद झाल्याची तक्रार असून त्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डोंगर कापल्यामुळे पुढील बाजूची जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या चार ते पाच घरांना गंभीर धोका निर्माण झाला असून उत्खनन करताना जमिनीच्या आत खोलवर माती काढली जात असल्याचा आरोपही होत आहे.चौपदरीकरणासाठी निश्चित करण्यात आलेली सीमारेषा वारंवार बदलली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यामुळे जीवित व मालमत्तेचा धोका वाढत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, स्थानिकांनी प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडे तातडीने संरक्षण भिंत उभारणे, सुरक्षित पद्धतीने उत्खनन करणे, बाधितांना योग्य मोबदला देणे आणि सीमारेषा स्पष्ट करणे यांसारख्या मागण्या केल्या आहेत. विकासकामांबरोबरच नागरिकांची सुरक्षितता देखील तितकीच महत्त्वाची आहे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.