Ratnagiri News – आगोटच्या खरेदीसाठी संगमेश्वर आठवडा बाजारात उसळली गर्दी
संगमेश्वर तालुक्यातील बुधवारी भरणारा आठवडा बाजार यंदा पावसाळा तोंडावर आल्याने आज अक्षरशः गजबजून गेला. आगोटच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कोकणात पावसाळ्यापूर्वी चार महिन्यांच्या शिदोरीची जी तयारी केली जाते, त्यालाच ‘आगोट’ असे म्हटले जाते आणि याच आगोटची लगबग या बाजारात प्रकर्षाने जाणवत होती.
रत्नागिरी जिल्ह्यासह शेजारील भागांतून आलेल्या व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. भाजीपाला, फळे, सुकी व ओली मासळी, गरम मसाले तसेच लाल मिरचीची मोठी आवक झाली होती. विशेषतः कांदे, बटाटे आणि लसूण यांसारख्या टिकाऊ वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसत होते.
पावसाळ्यात वाहतुकीवर परिणाम होऊन ताज्या भाज्यांची उपलब्धता कमी होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक वर्षभराचा तिखट मसाला आणि टिकणारा भाजीपाला आधीच साठवून ठेवतात. यंदाही त्याच पारंपरिक पद्धतीनुसार खरेदी होत असल्याचे दिसून आले. महिलावर्गाने गरम मसाले, सुक्या मिरच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, सोडे, सुकट आणि वाकटी यांसारख्या सुक्या मासळीच्या बाजारातही मोठी उलाढाल झाली. पावसापासून संरक्षणासाठी लागणाऱ्या ताडपत्र्या तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारी स्टेशनरी खरेदी करण्यासाठीही पालकांनी बाजारात हजेरी लावली. तालुक्यातील गावागावातून आलेल्या नागरिकांमुळे सकाळपासूनच संगमेश्वर बाजारपेठ माणसांनी फुलून गेली होती.
परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आणलेल्या वैविध्यपूर्ण मालामुळे आणि पावसाळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या लगबगीमुळे हा बाजार तालुक्यातील आर्थिक उलाढालीचे प्रमुख केंद्र ठरत आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांचा खरेदीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.
Comments are closed.