Ratnagiri News – वाळू वाहतुकीवरून दिवसाढवळ्या डंपर चालकावर रोखली बंदूक; परिसरात खळबळ

वाळू वाहतुकीवरून झालेल्या वादातून एका डंपर चालकाला भर रस्त्यात अडवून बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याची घटना संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील करजुवे ते माखजन मार्गावर दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हर्षद एकनाथ साळुंखे (वय २५, रा. चिखली साळुंखेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेले असून ते डंपर चालक म्हणून व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हर्षद साळुंखे हे त्यांच्या डंपरमध्ये करजुवे येथून वाळू भरून ते कडवईकडे घेऊन जात होते. करजुवे गावाजवळ आरोपी सूरज उदय नलावडे (वय २६, रा. करजुवे वातवाडी, ता. संगमेश्वर) याने त्यांचा डंपर अडवला. तो डंपरजवळ आला आणि त्याने थेट डंपरची चावी मागितली. हर्षद साळुंखे यांनी चावी मागण्याचे कारण विचारून चावी देण्यास स्पष्ट नकार दिला.
या गोष्टीचा आरोपी सुरज नलावडे याला प्रचंड राग आला. तो दारूच्या नशेत होता. त्याने तातडीने त्याचे सोबत आणलेली ग्रे रंगाची स्वीफ्ट डिझायर गाडी चालू केली आणि डंपरसमोर आडवी लावून हर्षद यांचा रस्ता अडवला. त्यानंतर तो गाडीतून खाली उतरला, तेव्हा त्याच्या हातात सिंगल बॅरल काडतुसची बंदूक होती. त्याने बंदुकीचा धाक दाखवत डंपरचा दरवाजा उघडला आणि जबरदस्तीने डंपरची चावी काढून घेतली. अश्लील शब्द वापरून दम असेल तर माझ्या घरातून चावी घेऊन जायला सांग, अशी उघड धमकी आरोपीने डंपर चालकाला दिली आणि चावी सोबत घेऊन तो निघून गेला.
या गंभीर घटनेनंतर डंपर चालक हर्षद साळुंखे यांनी तातडीने माखजन पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि त्यातून होणारे संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.