Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला

दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मागील आठवड्यापासून केळशी पंचक्रोशीत सतत पावसाची बरसात सुरू असल्याने भातशेतीत मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या भाताच्या चौंडयामध्ये पसवायला आलेली तसेच पसवलेली भातशेती पाण्यात आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचे खुप मोठे नुकसान झाले आहे.
केळशी पंचक्रोशीत पाणथळ भाग असलेल्या ठिकाणी महान म्हणजे उशिराने पसवणा-या भात पिकाची लावणी केली जाते. तर लवकर पाणी आटणा-या ठिकाणी हळवी म्हणजे लवकर कापायला होणा-या भात रोपांची लावणी करण्यात येते. रानडुक्कर तसेच वन्यप्राण्यांच्या त्रासाने त्रासलेले शेतकरी साडयांचा आधार देऊन भात शेतीचे पीक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. काहीवेळा रात्रीच्या वेळी राखण करुन पीक वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीला निसर्गाची अवकृपा पुरेशी ठरते. तसे यावर्षी येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले आहे. मोठे काबाडकष्ट उपसून फळाला आलेल्या भातशेतीचे पीक हातात येताच कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Comments are closed.