Ratnagiri News – राजापूरात मध्यरात्री घरावर दरोडा; पाच जणांच्या टोळक्याने घरात घुसून पैसे, दागिन्यांची केली मागणी

तालुक्यातील रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. कोळवणखडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका घरात शिरून 5 ते 6 दरोडोखोरांनी कुटुंबाला धमकावले पैशांची मागणी केली. धारधार कोयता दाखवत पैसे दिले नाही तर, जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात दुसरी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदानंद मोरे त्यांची पत्नी व तीन मुली असे कुटुंब झोपेत असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या मागच्या खिडकीतून दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि घरात मौल्यवान वस्तूंचा शोध घेत फिरू लागले. अचानक घरात अनोळखी ५ ते ६ जण घुसलेले पाहून मोरे कुटुंब जागे झाले. कुटुंबाने गोंधळ आरडा ओरडा करतानाच दरोडेखोरांनी घरातीलच कोयता हातात घेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. “पोलिसात गेलात तर संपवून टाकू!” अशी धमकी दिली. पैसे आणि दागिन्यांची मागणी दरोडेखोरांकडून करण्यात आली. घामाघूम झालेल्या मोरे कुटुंबाने तोंड बंद ठेवत जीव वाचवण्याच्या उद्देशाने घरात मुलींनी डब्यात बचत केलेली रक्कम काढून त्यांना दिली. यामध्ये १६०० रुपये त्यांनी दरोडेखोरांच्या हातात ठेवले. दरोडेखोरांनी तोंडावर मास्क बांधले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. याच दरम्यान मोरे कुटुंबातील ओरडण्याचा आवाजाने आजूबाजूचे गावकरी त्यांच्या घराच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच हे टोळकं घाईघाईने अणूस्कुरा मार्गावरून गाडीने पसार झाले. रात्रीचा अंधार आणि धूसर नंबर प्लेटमुळे गाडीचे नक्की ठिकाण अथवा वाहनाचा पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे कुटुंबानं सांगितले.

या घटनेची तक्रार सदानंद मोरे यांनी रात्री २ वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात नोंदवली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे तपास करत आहेत. चोरीच्या उद्देशाने हा दरोडा टाकण्यात आला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र सतत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या गस्त व सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेत नेमका किती मुद्देमाल गेला याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

राजापुरातील खून प्रकरणाच्या ठिकाणीच घटना घडल्याने पुन्हा भीती

काही दिवसांपूर्वीच याच रायपाटण पोलीस हद्दीत एका घरात घुसून वृद्ध महिलेची हत्या झाली होती. या प्रकरणाला जवळपास महिना उलटून गेला आहे तरीही मारेकऱ्यांचा अद्याप माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पहिल्या गुन्ह्याचे उत्तर मिळण्याआधीच दुसरी दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तातडीने टोळक्यांचा माग काढत कडक कारवाई न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Comments are closed.