Ratnagiri News – ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’च्या प्रशासनावर कठोर कारवाई करा; माजी खासदार हुसेन दलवाई यांची मागणी
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीच्या प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे. कंपनीचा घातक रासायनिक सांडपाण्याने भरलेला टँकर स्थानिक ग्रामस्थांनी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केले आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी (CETP) परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचा एक टँकर राजेंद्र आंब्रे, रवी गोवळकर, सचिन चाळके यांच्यासह अनेक स्थानिक ग्रामस्थांनी पकडला. या टँकरमध्ये ‘पीफास’ (PFAS – Per- and Polyfluoroalkyl Substances) या अत्यंत घातक रसायनाचा अवशेष (Residue) असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हे रासायनिक सांडपाणी प्रक्रियेसाठी सामुदायिक सांडपाणी प्रकल्पात नेण्यात आले होते, मात्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने तपासणीअंती ते स्वीकारण्यास नकार दिला.
ग्रामस्थांनी टँकर पकडल्यानंतर पोलीस घटनास्थळी हजर असूनही कोणताही अधिकृत पंचनामा करण्यात आला नाही. यावरून आंदोलक आणि ग्रामस्थांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पीफास हे मानवी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. कंपनीने यापूर्वी केलेले सुरक्षित विल्हेवाटीचे दावे आजच्या घटनेने संशयास्पद ठरले आहेत,” असे दलवाई यांनी म्हटले आहे.
कठोर कारवाईची मागणी
- MPCB कारवाई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर जप्त करून नमुन्यांची तातडीने तपासणी करावी.
- फौजदारी गुन्हा: पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ अंतर्गत संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा.
- महसूल व आरटीओ: जिल्हाधिकारी आणि आरटीओ विभागाने आवश्यक ती दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करावी.
- धोरणात्मक स्पष्टता: पीफास सारख्या घातक रसायनांच्या उत्पादनाबाबत आणि कचरा व्यवस्थापनाबाबत शासनाने कठोर धोरण तयार करावे.
“पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि घातक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार या प्रकरणात दोषींवर कठोर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे,” असेही दलवाई यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
Comments are closed.