Ratnagiri News – बदलत्या हवामानात बांबू शेती एक उत्तम पर्याय – कुलगुरु डॉ. संजय भावे

दरवर्षी हवामानात होणारा बदल आणि बदलते निसर्गचक्र यामुळे जमिनी पडीक होत चालल्या आहेत. या जमिनीवर विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकऱ्याने बांबूची शेती केल्यास शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्नाकडे नेण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी केले. विद्यापीठामध्ये आयोजित बांबू परिषद 2026 च्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. ठाणे व महाराष्ट्र बांबु विकास मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विदद्यामाने कोंकण बांबू परिषद विद्यापीठाच्या सर विश्वश्वैरया सभागृहात यशवीरित्या पार पडली.

बांबू हे अतिशय महत्वाचे पिक असून ते रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती व उत्पादन देणारे पिक आहे. त्याकडे एक उत्पन्नाचे साधन म्हणून त्यांची व्यावसायिकदृष्ट्या लागवड केली पाहिजे. तसेच तरुण पिढीने शेतीकडे वळण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. ठाणेचे कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन मुंबई, श्री. व्ही. गिरीराज, संचालक, कोकण बांबू व केन सेंटर, कुडाळ थी. संजीव कर्पे विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूरचे श्री. श्रीनिवास माडभूशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

दोन दिवस चाललेल्या या महत्वपूर्ण परिषदेमध्ये बांबुची शास्त्रीय लागवड, रोपवाटीका व्यवस्थापन, बांबू प्रक्रिया, लहान व मोठे उद्योग संधी व आव्हाने, उपलब्ध बाजारपेठ या विषयावर सविस्तर चर्चा झाली. यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेले बांबू तज्ज्ञ, अभ्यासक, व्यवसायिक, बांबू उद्योजक यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या विविध 30 जिल्ह्यातून एकूण बांबू शेती संबधित 375 शेतकरी या परिषदेकरीता उपस्थित होते. तसेच या परिषदेत शेतकऱ्यांना बांबुच्या विविध प्रजातींची माहिती देणारे प्रदर्शन, बांबुच्या वस्तू, बांबुचे कपडे यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. बांबूवर आधरित उदोगाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन या परिषदेमध्ये करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात बांबु प्रक्षेत्र शिवार फेरी आयोजित करण्यात आली.

Comments are closed.