Ratnagiri News – मैत्रीणीशी बोलतो म्हणून मामाकडून भाच्याची हत्या, आरोपीला पोलिसांकडून अटक

भाचा मैत्रीणीसोबत बराच वेळ बोलतो या कारणातून मामाने भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली. शहरातील मिरकरवाडा खडक मोहल्ला येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण मूळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून ते कामासाठी रत्नागिरीत आले होते. सध्या ते खडकमोहल्ला येथील मोबाईल दुकानाच्या फर्निचरचे काम करत होते. यावेळी मैत्रीणीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून नीरज नीषाद याने आपला भाचा प्रिन्स मंगरू निषाद याची हत्या केली. फर्निचरच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या आरीने प्रिन्सची हत्या केली. यानंतर नीरज नीषाद आणि अनुज चौरासिया हे पळून गेले.
ठेकेदार रविकुमार भारती याने 112 ला फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. आरोपी पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत रत्नागिरी रेल्वे स्थानकात दोघांना पकडले. आरोपींना शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.