Ratnagiri News – मोबाईल बॅटरी चोरणारी टोळी गजाआड, चार आरोपी ताब्यात; सवा सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी शहर आणि पावस परिसरात अनेक दिवसांपासून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आला. या पथकाने मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून 6 लाख 27 हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांनी एक पथक तयार करून मोबाईल बॅटरी चोरणाऱ्यांचा शोध सुरू केला. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे टोळीचा छडा लावला. पथकाने चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये राहुल तोडणकर, शुभम खडपे, मुस्तफा गुडू पठाण आणि विकास सुतार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी पावस आणि रत्नागिरी परिसरात विविध ठिकाणी मोबाईल टॉवर बॅटऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाख 27 हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींकडून पावस आणि रत्नागिरी परिसरातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, प्रमोद वाघ, संदीप ओगले, विजय आंबेकर, दीपराज पाटील, अमित कदम आणि दत्तात्रय कांबळे या पथकाने केली आहे.

Comments are closed.