Ratnagiri News – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण; संगमेश्वरातील जोडरस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात येत असताना संगमेश्वर परिसरातील जोडरस्त्यांचा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. अनेक ठिकाणी महामार्ग तयार झाला असला तरी स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि वाहनचालकांना महामार्गावर सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी आवश्यक जोडरस्ते उपलब्ध नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या संगमेश्वर शहर, बाजारपेठ, पोस्ट ऑफिस परिसर तसेच इतर वस्ती भागांना महामार्गाशी जोडणारे रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना थेट महामार्गावरूनच प्रवास करावा लागत असून वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः पैसा फंड हायस्कूल परिसरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागत असून सुरक्षित जोडरस्ता, सेवा रस्ता अथवा पादचारी सुविधा नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “महामार्ग पूर्ण होत आहे, पण त्यावर सुरक्षितपणे पोहोचायचे कसे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच पोस्ट ऑफिस, संगमेश्वर बाजारपेठ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठीही योग्य जोडरस्त्यांची व्यवस्था नसल्याने स्थानिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तात्पुरत्या मार्गांचा वापर केला जात असून हे मार्ग धोकादायक ठरत आहेत.
महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे जात असताना संबंधित विभागाने संगमेश्वर परिसरातील सर्व जोडरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, आवश्यक ठिकाणी सूचना फलक, वेगरोधक, पादचारी मार्ग व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
Comments are closed.