Ratnagiri News – कोळी गीतांच्या तालावर थिरकत पाजपंढरीत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

पारंपारीक कोळी गीतांच्या तालावर थिरकत पाजपंढरीतील कोळी बांधवांनी उत्साहात नारळी पौर्णिम साजरी केली. होडीतून सजविलेल्या सोन्याच्या नारळाची श्रीराम मंदिरापासून अखंड गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर हा सोन्याचा वर्ख लावून सजविलेला नारळ प्रार्थना करुन समुद्राला अर्पण केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले पाजपंढरी हे गाव संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले मच्छिमार लोकवस्तीचे गाव आहे. पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव आपल्या पारंपारिक कोळी वेशभूषेत आणि कोळी गीतांच्या ठेक्यावर नाचत नारळ समुद्राला अर्पण करतात. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येत असतात. दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी समस्त कोळी बांधवांच्या या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडून गालबोट लागू नये यासाठी स्वतः उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरवर्षी मासेमारी करण्याच्या शुभारंभाला मासेमारीला समुद्रात जाण्याआधी खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधव सागराची विधिवत पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. यावर्षी नारळी पौर्णिमा दुपारनंतर साजरी करण्यात आली. संपूर्ण पाजपंढरी गावातून कोळी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वाद्ये आणि गीतांच्या तालावर वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली.

पाजपंढरी गावात एकूण 10 मंडळे आहेत. दरवर्षी यजमान पार्टीला गावात वर्षभर होणारे सण उत्सव साजरे करण्याचा गावाकडूनच मान दिला जातो. त्यानुसार यावर्षी यजमान रस्ताळे मंडळ आहे. त्यामुळे यावर्षीचा मान रस्ताळे मंडळीला मिळाला. त्यामुळे पाजपंढरी या गावातर्फे यजमान रस्ताळे मंडळाने समुद्राला गावातर्फे नारळ अर्पण केला. अन्य गोरेवाले, तुरेवाले मंडळ, शेतवाडी मंडळ, होमावाले मंडळ, जुनी कुलापकर मंडळ, नवीन कुलापकर मंडळ, विठाबाई मंडळ, वाडीवाले मंडळ, मधली आळी मंडळ या अशा पाजपंढरी गावातील मंडळांनी आपापल्या मंडळाचे नारळ समुद्राला अर्पण केले.

Comments are closed.