Ratnagiri News – मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलिसांची नजर, थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी प्रशासन सज्ज

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. थर्टी फर्स्ट च्या जल्लोष पार्टी वर पोलिसांची करडी नजर राहणार असून मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस सज्ज रहाणार आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. थर्टी फर्स्ट साजरा करताना होणारी गर्दी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची वाहन तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३१ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ दरम्यान २४ तास जल्लोषाच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण पथकाकडून पोलीस त्यावर बारीक नजर ठेवणार आहेत. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
महिला पथक तैनात
थर्टी फस्टला मध्यरात्री जल्लोष केला जातो. त्यादरम्यान महिलांची छेडछाड होऊ नये, याकरिता जिल्हा पोलीस दलाने महिला पथक तैनात ठेवले आहे. जिल्ह्यात वाहतूक नियोजनासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून मदतीकरिता पर्यटकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.

Comments are closed.