Ratnagiri News – रॅगिंग प्रकरणातील दोषींना पाठीशी घातल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवू; युवासेनेचा इशारा
रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना ‘शिवसेना स्टाईल’ने धडा शिकवला जाईल, असा आक्रमक इशारा युवासेनेने महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे. यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. “दोषी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयातून काढून टाकावे, अशी आमची टोकाची भूमिका नाही. मात्र, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी दोषींवर महाविद्यालयीन स्तरावर कडक अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे,” असे सावंत यांनी यावेळी ठणकावून सांगितले. यावेळी शहरप्रमुख आशिष चव्हाण आणि नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे यांचीही उपस्थिती होती.
युवासेनेने प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
- रॅगिंग पीडित विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊनही महाविद्यालय प्रशासन गप्प का?
- घटनेला काही दिवस उलटूनही प्रशासनाने दोषींवर कोणती कारवाई केली?
- प्राचार्य म्हणून आपली जबाबदारी नेमकी काय?
या इशाऱ्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील यांनी आपली बाजू मांडली. “सध्या रॅगिंग प्रकरणाची अंतर्गत समितीमार्फत चौकशी सुरू आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जात असून, येत्या दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल,” असे आश्वासन प्राचार्यांनी युवासेनेला दिले आहे.
“आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जर प्रशासनाने या प्रकरणाची ‘मिटवामिटवी’ करण्याचा प्रयत्न केला किंवा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर युवासेना आपल्या पद्धतीने याला प्रत्युत्तर देईल.” — प्रसाद सावंत, जिल्हा युवाधिकारी, युवासेना.
Comments are closed.