ई-टपाल कक्षातून टपाल पोहचायला तब्बल 10 दिवस लागतात, शिवसेना जि.प. सदस्य संतोष थेराडेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने टपाल गोळा करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ एक कक्ष उभारला. मात्र या कक्षात जमा केलेले टपाल संबंधित विभागाकडे जाण्यासाठी दहा ते बारा दिवस लागत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी केला. शुक्रवारी आयोजित विशेष सभेत ते बोलत होते. यावेळी कक्ष उभारण्यासाठी इतका खर्च कशासाठी केला असा सवालही थेराडे यांनी उपस्थित केला.

पूर्वीची टपाल गोळा करण्याची पद्धत होती ती वेगवान होती. या ई-टपाल पद्धतीत टपाल पोहचवण्यास विलंब होत असल्याचा आरोप संतोष थेराडे यांनी केला आहे. टपाल कक्ष सुरू करण्यासाठी केलेल्या खर्चावरही त्यांनी बोट ठेवल्याने खळबळ उडाली आहे.

सावर्डे पोलीस ठाणे भाडे देते का?

सावर्डे पोलीस ठाणे हे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत सुरू आहे. अशावेळी सावर्डे पोलीस ठाणे जिल्हा परिषदेला इमारतीचे भाडे देते का? असा सवाल सदस्य संतोष थेराडे यांनी उपस्थित केला आहे.

माझे प्रश्न लिहून घेतले का? गटनेते विक्रांत जाधव आक्रमक

शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर चार प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विक्रांत जाधव यांनी विचारले होते. उत्तराच्या वेळी माझे चार प्रश्न लिहून घेतले का? असा सवाल उपस्थित केला. दायित्वासाठीच्या 50 लाखाच्या रक्कमेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. लघुपाटबंधारे योजना पुनर्वसनाबात त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. जंगलसाठी केलेल्या तरतुदीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

33 कोटी 61 लाख 73 हजार 500 रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी अंदाजपत्रक सादर केले. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 2025-26 च्या 45 कोटी 90 लाख 94 हजार 991 च्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकाला आणि 33 कोटी 61 लाख 73 हजार 500 रुपयांच्या अंदाजपत्रकाला जिल्हा परिषदेने मंजुरी दिली.

Comments are closed.