Ratnagiri News – शाळा बंद आंदोलन; नाटेतील तांदूळ चोरी प्रकरणी शिक्षकांचे निलंबन रखडल्याने पालक आक्रमक

राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला–वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी पोषण आहारातील तांदूळ चोरी प्रकरण उघडकीस आलं होतं. यामुळे मुख्याध्यापक व उपशिक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त पालक व ग्रामस्थांनी बुधवारपासून शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.
नाटेनगर विद्यालयाच्या गोदामातून ५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजता पोषण आहारासाठीचा तांदूळ चोरून नेणारे वाहन काही जागरूक नागरिकांनी अडवून नाटे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी ग्रामस्थ मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून वाहन चालक कुणाल अनिल थळेश्री व सुनील वसंत डुगीलकर यांच्यासह शाळेचे सहाय्यक शिक्षक नाना बीरा करे आणि मुख्याध्यापक रवींद्र जाधव यांच्या विरोधात नाटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक जाधव व उपशिक्षक करे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश संस्थाप्रमुख असलेल्या नाटे सरपंचांना दिले होते. मात्र, संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शासकीय पोषण आहारातील तांदूळ चोरी व अनियमिततेच्या प्रकरणी संबंधित शिक्षकांचे निलंबन करून चौकशी समिती नेमली जात नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यानुसार बुधवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेच्या गेटबाहेर जमा झाले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘शाळा बंद आंदोलन’ असा फलक लावण्यात आला असून विद्यार्थीही शाळेच्या गेटबाहेर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आता कोणती भूमिका घेणार, याकडे नाटेवासीयांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.