Ratnagiri News जगबुडी नदीत चार सख्खे भाऊ बुडाले, तिघांचा मृत्यू
खेड शहर व भोस्ते गावाच्या सीमेवर वाहणाऱ्या जगबुडी नदीतील बदामीचा पऱ्या येथील खोल डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या सख्ख्या चार भावांपैकी तीन भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी १० जून रोजी दुपारी सुमारे ३च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारवाडा परिसरात राहणाऱ्या अनिल दगडू कांबळे यांचे चार पुतणे मुंबईवरून आले होते. उकाड्यापासून दिलासा मिळावा तसेच पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ते जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. बदामीच्या पऱ्या येथील खोल डोहात ते पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही बुडू लागले.
यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र डोहातील खोल पाणी व प्रवाहामुळे तिघे जण पाण्यात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत गोपाळ रामा कांबळे (वय ४०) या मोठ्या भावाचा सुदैवाने जीव वाचला, तर त्याच्या मागील तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये आकाश रामा कांबळे (वय २३), नरेश रामा कांबळे (वय २२) आणि कैलास रामा कांबळे (वय १७) यांचा समावेश आहे. हे सर्व मूळचे सांगली येथील असून सध्या मुंबईतील चेंबूर मेट्रो स्टेशन परिसरात वास्तव्यास होते.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या तीन मुलांना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नदी, डोह व धरण परिसरात पोहण्यासाठी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Comments are closed.