Ratnagiri News – सरत्या वर्षाला चिकन-मटण आणि ताज्या फडफडीत माशांचा बेत, ‘प्या’रे लाल मंडळींनी शोधल्या ‘खोपच्या’तील जागा

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली आहे. थर्टी फर्स्ट ला बुधवार असल्याने खवय्यांनी चिकन-मटण वड्यांबरोबरच ताज्या फडफडीत माशांचे बेत आखले आहेत. ”प्या” रेलाल मंडळींनी खास पार्ट्यांचे आयोजन केले आहे. काही मंडळींनी पार्ट्यांसाठी “खोपच्या”तील जागा निवडल्या आहेत. मात्र सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग नजर ठेवून आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल आणि रेस्टॉंरंट यांनी विशेष ऑफर ठेवल्या आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात आल्याने हॉटेल हाऊसफुल झाली आहेत. गणपतीपुळे,वेळणेश्वर,हर्णे,मुरूड,भाट्ये आणि मांडवी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाांची गर्दी पहायला मिळत आहे. उद्या रात्री १२ वाजता नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यात येणार असून अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.
परमिट रूम पहाटे पाचपर्यंत
थर्टी फर्स्ट साठी उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री दुकाने आणि परमिट रूमना व्यवसायासाठी वेळ वाढवून दिला आहे. विदेशी दारू विक्रीची दुकाने उद्या रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. परमिट रूम आणि बीअरबार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
पोलीसांची नजर
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून जल्लोषाच्या पार्ट्यांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत. दारू पिण्याचा परवाना नसताना कुठे पार्ट्या होत असल्याचे आढळल्यास उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार आहे. साध्या वेशातील पोलीसही हुल्लडबाजीवर लक्ष ठेवणार आहेत.
चिकन, मासे महागले
उद्या बुधवार असल्याने चिकन-मटणावर ताव मारला जाणार आहे. चिकनचा दर किलोमागे दहा रूपयाने वाढला आहे. सुरमईही ८०० ते ९०० रूपये किलोच्या घरात पोहोचली आहे. त्याचबरोबर कोळंबी, सौंदळा, बांगडा आणि काही प्रमाणात पापलेट बाजारात उपलब्ध आहेत.

Comments are closed.