Ratnagiri News – अखेर 14 तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर

मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याने अपघात झाला. अपघातानंतर टॅंकरमधून वायुगळती होऊ लागली, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली होती. तसेच परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. दुसरा टॅंकर आणून अपघातग्रस्त टॅंकरमधील वायू दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्यात आला. त्यानंतर सुमारे 14 तासांनी मंगळवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मुंबई-गोवा महामार्गावरील ठप्प असलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

जयगडवरून गोव्याकडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टॅंकरला हातखंबा येथे अपघात झाला. अपघातानंतर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. टॅंकरमधून वायुगळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत हातखंबा गावाजवळील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

अपघातस्थळी गॅस टँकरमधील वायू रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर बोलावण्यात आला. तात्काळ वायू रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सोमवारी दुपारी साडे बारा वाजता अपघातग्रस्त टॅंकरमधील वायू दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सुरक्षेची खात्री करून दुपारी 2 वा 10 मिनिटांनी महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हलक्या वाहनांना वळके ते बावनदी या पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते.

दोन महिन्यातील हा दुसरा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टॅंकर पलटी होण्याची ही दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. जून महिन्यात शिक्षकांच्या खासगी बसला धडक देऊन एलपीजी गॅस टॅंकर निवळी घाटात पलटी झाला होता. त्यावेळी वायुगळती होऊन आगही लागली होती. तेव्हा महामार्ग 17 तास ठप्प होता.

Comments are closed.