Ratnagiri News – जिल्हा रूग्णालयात एक्स-रे फिल्मचा तुटवडा, 8 दिवसांत समस्या न सुटल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील विविध समस्यांबाबत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मांडलेल्या समस्या येत्या आठ दिवसांत सोडवल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आला.
सध्या या रुग्णालयात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालयात एक्स-रे फिल्म उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णांना बाहेरून महागडे एक्स-रे काढून घ्यावे लागत आहेत. तसेच रुग्णालयातील शौचालये पूर्णपणे भरलेली असून तिथे प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपत्कालीन आणि अपघात विभागाची स्थितीही दयनीय असून गंभीर रुग्णांवर वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांऐवजी कंत्राटी वॉर्ड बॉय काम करत असल्याने रुग्णांची सेवा योग्य प्रकारे होत नाही. याशिवाय, रुग्णालयाच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी योग्य पार्किंग व्यवस्था नसल्याने रुग्णवाहिकांना येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
हे निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर, तसेच विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वारेकर, मंदार, अमन राणे आणि गौरव कळंबटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.