Ratnagiri News – प्रधानमंत्री सिल्वर कपमध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक हिंदुस्तानात तिसऱ्या क्रमांकावर, AI चा वापर करून तयार केले रेडस् ॲप
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या एआय आधारित ‘रॅड्स’ ॲपला ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक मिळाला आहे.पोलीस तपासात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करून रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी देशपातळीवर नवा आदर्श निर्माण केला आहे. नितीन बगाटे यांनी सर्वप्रथम पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले.त्यानंतर अंतिम सादरीकरणानंतर त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
रेडस् ॲपच्या मदतीने बेवारस व ओळख पटू न शकलेल्या व्यक्तींची ओळख पटविणे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, तसेच विविध गुन्ह्यांतील पाहिजे व फरार आरोपींचे चेहरे उपलब्ध माहितीच्या आधारे डिजिटल पद्धतीने पुनर्निर्मित करून त्यांचा शोध घेणे सोपे झाले असून अनेक गुन्ह्यामध्ये रेडस् ॲपचा यशस्वी उपयोग झाला आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या ‘रॅड्स’ ॲपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे करण्यात आले. ओळख पटू न शकलेल्या किंवा बेवारस व्यक्तीच्या प्रकरणातील उपलब्ध माहिती एकत्रित करून छायाचित्रे व अन्य माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार करण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे.
१५३ बेवारस प्रकरणांची नोंद
या ॲपच्या विकासामध्ये पोलीस अंमलदार अभिजीत दळवी (पोलीस तंत्रज्ञ), तसेच तंत्रज्ञ जितेश जैस्वाल आणि रितेश जैस्वाल यांनी महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदान दिले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून आणि अभिनव संकल्पनेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यप्रणालीचे स्वरूप देण्यात या विकास पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सहकार्याने तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि विकास पथकाच्या तांत्रिक योगदानातून साकारलेले ‘रॅड्स’ ॲप पोलिस तपास अधिक सक्षम, गतिमान व परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
Comments are closed.