रत्नागिरीत माणुसकीला काळीमा, भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले; धारदार शस्त्राने डोक्यावर वार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी शहरात पेठकिल्ला रोड परिसरात अज्ञात इसमाने कुत्र्याला बेदम मारहाण करत दोन्ही डोळे फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी संध्याकाळी ५:३० ते ७ जून रोजी सकाळी १० या कालावधीत ही घटना घडली. पेठकिल्ला रोडवरील पाथरे बागेच्या बाजूला, नाईक कंपनीसमोर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका भटक्या कुत्र्याला लक्ष्य केले. आरोपीने अतिशय क्रूरपणे कुत्र्याचे दोन्ही डोळे फोडले, ज्यामुळे एक डोळा बाहेर आला होता. तसेच, टोकदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार केले आणि कुत्र्याचे दोन्ही मागचे पाय बांधून, डावा पाय तोडून त्याला गंभीर जखमी केले.

या घटनेबाबत इशान प्रसाद खानोलकर (वय २२, रा. बंदर रोड, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(A) आणि ११(१)(I) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या क्रूर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, प्राणी प्रेमींकडून आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Comments are closed.