इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात हवा 'हा' स्टार खेळाडू! माजी दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ज्या खेळाडूचे नाव फारसे चर्चेत नाही अशा खेळाडूचा समावेश करण्याची बाजू भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मांडली आहे. शास्त्रींना वाटते की या खेळाडूला संघात ठेवणे भारतासाठी फायदेशीर ठरेल.
23 वर्षीय हा खेळाडू 2025च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) चांगली कामगिरी करत आहे. या फलंदाजाला इंग्लंडमध्ये रेड-बॉल क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याने काउंटीमध्ये सरे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 5 सामन्यांमध्ये 281 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.
शास्त्री ज्या क्रिकेटपटूबद्दल बोलत आहेत तो साई सुदर्शन (Sai Sudharsan) आहे. गुजरात टायटन्सकडून (GT) आयपीएलमध्ये खेळणारा सुदर्शन याला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे आणि माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा असा विश्वास आहे की, हा अनुभव आणि त्याचे मजबूत तंत्र त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी परिपूर्ण बनवते.
साई सुदर्शनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. तो इंडिया-अ सोबत अनेक दौऱ्यांवर गेला आहे. शुबमन गिलला दुखापत झाली तेव्हा 2024-25च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर या डावखुऱ्या फलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळणार होते. पण, गिलच्या जागी देवदत्त पडिकलची संघात निवड करण्यात आली.
आयसीसीच्या पुनरावलोकनात शास्त्री म्हणाले, “मी साई सुदर्शन हा युवा फलंदाज सर्व फॉरमॅटसाठी पाहतो. तो माझ्यासाठी एक उत्तम खेळाडू आहे असे वाटते. माझ्या नजरा नक्कीच त्याच्यावर असतील. इंग्लंडमध्ये एक डावखुरा फलंदाज, जो इंग्लंडची परिस्थिती चांगली समजतो आणि त्याचे तंत्र, तो ज्या पद्धतीने खेळतो, तो माझ्या यादीत सर्वात वर असेल.”
साई सुदर्शन देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करत आहे. त्याने 2022 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2024-25 मध्ये त्याने तमिळनाडूसाठी त्याच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये 304 धावा केल्या. यामध्ये दिल्लीविरुद्धचे द्विशतक समाविष्ट होते.
यंदाच्या आयपीएल हंगामात साई सुदर्शन गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातसाठी 9 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 8 डावात फलंदाजी करताना त्याने 50.67च्या सरासरीने 456 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 150 राहिला आहे. दरम्यान त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत.
Comments are closed.