…आणि हा चेंडू थेट रवी शास्त्री स्टँडच्या छतावर! वानखेडेवर ‘रवी शास्त्री स्टँड’चे दिमाखदार अनावरण
– गणेश पुराणिक
धोनी फिनिशेस ऑफ स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप आफ्टर 28 इयर्स… 2011 मध्ये वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने उत्तुंग षटकार ठोकला आणि क्रिकेट समालोचक रवी शास्त्री मोठ्या उत्साहात हे अजरामर वाक्य म्हणाले. आजही वानखेडे मैदानावर गेल्यावर क्रीडाप्रेमींच्या कानात हे वाक्य घुमत असणार… याच मैदानावर रवी शास्त्री यांनी बडोदा विरुद्ध सलग सहा षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. टीम इंडिया आणि मुंबई क्रिकेटच्या कितीतरी आठवणींचे साक्षीदार राहिलेल्या याच ऐतिहासिक मैदानावर आता “रवी शास्त्री स्टँड” हे नाव ठळक अक्षरात झळकले आहे.
गुरुवारी वानखेडे मैदानावर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टीम इंडियाचे माजी खेळाडू एकनाथ सोलकर, महिला खेळाडू डायना एडुलजी आणि दिलीप सरदेसाई यांच्या नावाने गेट्सचे तसेच रवी शास्त्री यांच्या नावाने स्टँडचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. बाळासाहेब ठाकरे पत्रकार कक्षाच्या खाली रवी शास्त्री स्टँड बनवण्यात आले असून याच ठिकाणी बरोबर 41 वर्षांपूर्वी रवी शास्त्री यांनी सहावा षटकार ठोकला होता. आज तिथे त्यांच्या नावाचे स्टँड अभिमानाने झळकत आहे. यावेळी रवी शास्त्री अनेक आठवणींना उजाळा दिला.
1976 मध्ये त्यांनी याच मैदानात बसून रिचर्ड हेडली यांच्यासारख्या महान गोलंदाजाला खेळताना पाहिले होते. तेव्हा मला कल्पनाही नव्हती की बरोबर 5 वर्षांनंतर मी पदार्पण करेन आणि हॅडलीच मला गोलंदाजी करतील, असे शास्त्री यांनी सांगितले.
शास्त्रींनी त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण म्हणजेच बडोद्याविरुद्ध मारलेल्या 6 षटकारांच्या आठवणींना देखील उजाळा दिला. जेव्हा मी 4 षटकार मारले, तेव्हा वाटले की आता पूर्ण ‘Full Monty’ (सहाच्या सहा षटकार) साठी प्रयत्न करायला हवा. सुनील गावस्कर यांनी तेव्हा मैदानात निरोप पाठवला होता की, तू बिनधास्त खेळ. त्या काळी टीव्ही कॅमेरे कमी होते, पण इथल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांत तो क्षण आजही ताजा आहे, असे शास्त्री म्हणाले. वानखेडेवर अनेक षटकार मारले गेले आहेत. पण माझा आवडता फटका तो होता, जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रूस रीड यांच्या चेंडूवर षटकार ठोकला होता जो आजच्या रवी शास्त्री स्टँडच्या वरून गेला होता असेही यावेळी ते म्हणाले.
रणजी करंडकाच्या एका अंतिम सामन्यात दिल्लीच्या संघाने एक दिवस आधीच विजयाचा जल्लोष सुरू केला होता. तेव्हा कीर्ती आझाद यांनी शास्त्रींना डिवचले होते, “ट्रॉफी उद्यासाठी नीट पॉलिश करून ठेवा.” त्यावर शास्त्रींनी दुसऱ्या दिवशी दिल्लीला पराभूत केल्यावर उत्तर दिले होते, “ट्रॉफी तर पॉलिश केलीच आहे, पण ती आता आमच्याकडेच राहणार आहे!”
मुंबई क्रिकेटच्या परंपरेबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले की, “दिलीप सरदेसाई असोत की सुनील गावस्कर, मुंबईच्या क्रिकेटमध्ये हार न मानण्याची खडूस वृत्ती आहे. आम्ही कधीच हार मानत नाही. जोपर्यंत सामना संपत नाही, तोपर्यंत समोरच्याला विजयासाठी पाच मंदिरांत जाऊन प्रार्थना करावी लागेल, तरीही आम्ही विजय सोडणार नाही.”
आपल्या कुटुंबाचा उल्लेख करताना शास्त्री भावूक झाले. “माझे वडील क्रिकेटवेडे होते, पण माझी 86 वर्षांची आई त्यांच्यापेक्षाही जास्त क्रिकेटची चाहती आहे. 1960 पासून त्यांनी माझे सर्व सामने पाहिले आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथवर पोहोचलो,” असे त्यांनी नमूद केले.
भाषणाच्या शेवटी शास्त्रींनी त्यांच्या खास शैलीत स्वतःवरच एक ‘कॉमेंट्री’ केली: “शास्त्री ऑन स्ट्राईक… शास्त्री गोज बिग! आणि हा चेंडू थेट रवी शास्त्री स्टँडच्या छतावर!” त्यांच्या या वाक्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी त्यांनी युवा क्रिकेटपटूंना देखील सल्ला दिला. वानखेडे स्टेडियमच्या वास्तूत पाऊल ठेवताच इथल्या ऐतिहासिक वैभवाची जाणीव होते. आज जेव्हा आपण आजूबाजूला पाहतो, तेव्हा वेंगसरकर, गावसकर, विजय मर्चंट, तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंची नावे झळकताना दिसतात; यातूनच मुंबई क्रिकेटचा महान वारसा अधोरेखित होतो. अशा दिग्गज नावांच्या मांदियाळीत आता माझेही नाव कायमचे कोरले जाणे, ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची आणि मोठी गोष्ट आहे. या स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रत्येक नवोदित खेळाडूला ही नावे पाहून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि एक स्पष्ट संदेश मिळेल की, यशासाठी कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो. आज मी इथवर पोहोचलो असलो, तरी त्यामागे बस आणि ट्रेनचा खडतर प्रवास आहे. मी मुंबईतील जवळपास सर्वच मैदानांवर क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळेच तरुणांनी जास्तीत जास्त प्रथम श्रेणी सामने खेळण्यावर भर द्यावा आणि जिथे शक्य असेल तिथे क्रिकेट खेळावे. कष्टाचे आणि सातत्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःला सिद्ध करा,असे ते म्हणाले.
Comments are closed.