T-20WC2026: ‘भारताचा पराभव झाला हे बरंच झालं..’, भारताच्या पराभवावर रवी शास्त्री असं का म्हणाले?

टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) च्या सुपर-8 सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सेमीफायनलचा रस्ता कठीण झाला आहे. मात्र, या पराभवानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक सकारात्मक विधान केले आहे.

रवी शास्त्रींच्या मते, हा पराभव भारतासाठी एक प्रकारचा इशारा आहे. ‘आयसीसी रिव्ह्यू शो’मध्ये बोलताना ते म्हणाले, मला आनंद आहे की भारताला हा धक्का आताच बसला. मोठ्या सामन्यांआधी असा झटका मिळणे गरजेचे होते, जेणेकरून संघ गाफील राहणार नाही. आता उरलेल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडिया चांगली रणनीती बनवू शकेल. तसेच दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघाविरुद्ध हरल्यामुळे आपल्याला आपल्या चुका समजल्या आहेत. मला पूर्ण खात्री आहे की, भारतीय संघ या अनुभवातून शिकून जोरदार पुनरागमन करेल.

संघातील बदलांबाबत बोलताना शास्त्रींनी महत्त्वाचे सल्ले दिले, संघात अक्षर पटेलचा समावेश करायला हवा, कारण अशा मोठ्या स्पर्धेत अनुभवाची गरज असते. शक्य असल्यास अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान द्या. एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असू शकतो (जसे वरुण चक्रवर्तीच्या बाबतीत झाले), अशा वेळी तुमच्याकडे जास्तीचा गोलंदाज असणे आवश्यक आहे. जर 8 व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असूनही आपण अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय ठेवत नसू, तर ते चुकीचे आहे.

शास्त्री पुढे म्हणाले की, अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी गरज पडल्यास रिंकू सिंगला बाहेर बसावे लागेल. जर रिंकू सिंगला खेळवायचेच असेल, तर त्याला एखाद्या स्पेशलिस्ट फलंदाजाच्या जागी संघात स्थान द्यायला हवे.

Comments are closed.