हा तर टीम इंडियाचा भावी युवराज, अश्विनकडून अभिषेक शर्माच्या फलंदाजीचे कौतुक

आशिया चषकात हिंदुस्थानचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा झंझावाती फलंदाजी करत आहे. त्याच्या या खेळीने माजी फिरकीवीर रविचंद्रन अश्विन आणि केविन पीटरसन हे अक्षरशः थक्क झाले आहेत. हा तर पुढचा युवराज असल्याचे भाकितही अश्विनने वर्तवले.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, हा अभिषेकचा प्रारंभ आहे. त्याचं भविष्य खूप दीर्घ आहे आणि तो जगभरात झंझावाती कामगिरी करणार. युवराज सिंह जसा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचा महान खेळाडू ठरला, तशीच क्षमता अभिषेककडेही आहे. तो युवराजची परंपरा पुढे नेईल, असेही अश्विन अभिमानाने म्हणाला. अभिषेकने आपल्या डावात 6 चौकार आणि 5 षटकार ठोकले. मात्र अश्विनच्या मते त्याचा सर्वात देखणा फटका म्हणजे सईम अयूबविरुद्ध मारलेला धोनीच्या शैलीतील हेलिकॉप्टर कवर ड्राईव्ह होता.

पीटरसनही झाला फॅन

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसन म्हणाला, ‘अभिषेक वेगळ्याच स्तराचा खेळाडू आहे. काहीवेळा तो अपयशी ठरेल, पण बहुतेक वेळा जगभरातील गोलंदाजांना धुऊन काढेल. त्याच्या डोळ्यांत धावांची भूक दिसते. हा आत्मविश्वास कायम ठेव, मित्रा.

Comments are closed.