‘सर’ जडेजाचा सुवर्ण प्रवास: सचिनसोबत खेळला, धोनी-रोहितसोबत ट्रॉफी उचलली, शुबमनसोबत टीमचा खरा आधार!
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा नुकताच संपला आहे. ज्यात पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने आपली खरी किंमत दाखवली. कसोटी मालिकेत भारत अडचणीत आला तेव्हा बॅटिंग असो किंवा गोलंदाजी, ‘सर’ जडेजा नेहमीच पुढे सरसावला. या दौऱ्यात त्याने पाचही कसोटी सामने खेळले. ज्यात त्याने तब्बल 86 च्या सरासरीनं 516 धावा ठोकल्या. यात 1 शतक आणि 5 अर्धशतकं समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, कसोटी मालिकेत 6 वा किंवा खालच्या क्रमांकावर खेळत 500+ धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला.
मँचेस्टर कसोटीत जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी नाबाद 203 धावांची भागीदारी करत भारताला पराभवापासून वाचवलं. जडेजा 107* आणि सुंदर 101* धावांवर तटस्थ राहिले. ही भागीदारी दौऱ्यातील सर्वात संस्मरणीय ठरली. एजबेस्टन कसोटीत जडेजाने दोन्ही डावांत अर्धशतकं (89 आणि 69*) ठोकली. तर ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात त्याने महत्त्वपूर्ण 53 धावा करून भारताच्या विजयात हातभार लावला.
जरी शुबमन गिल, जो रूट आणि केएल राहुल यांनी जडेजापेक्षा जास्त धावा केल्या असल्या, तरी सरासरीच्या बाबतीत जडेजा सर्वाधिक प्रभावी ठरला. गोलंदाजीत त्याने 142.1 षटकांत 7 बळी घेतले. इंग्लंडच्या स्पिनला न अनुकूल असलेल्या पिचेसवर हे प्रदर्शनही कौतुकास्पद ठरलं.
डिसेंबर 2012 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण करणारा जडेजा आज शुबमन गिलच्या कर्णधारपदाखाली संघातील सर्वात सिनीयर खेळाडू आहे. मैदानावर ऑलराउंडरची भूमिका बजावताना तो ड्रेसिंग रूममध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत राहतो.
जडेजाने आतापर्यंत 85 कसोटी सामने खेळून 3886 धावा आणि 330 बळी घेतले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 204 सामन्यांत 2806 धावा आणि 231 बळी आहेत. तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 74 सामन्यांत 515 धावा आणि 54 बळी घेतले. तो बराच काळ आयसीसी कसोटी ऑलराउंडर रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे.
2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते 2024 टी20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत जडेजा विजयी संघाचा भाग राहिला आहे. 2024 नंतर त्यानं टी20 क्रिकेटला अलविदा केलं असून आता तो कसोटी आणि वनडेवर लक्ष केंद्रीत करत आहे.
Comments are closed.