Ravindra Waikar asks Uddhav Thackeray to stop ED action


(Ravindra Waikar) मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रवींद्र वायकर हे मुंबई महानगरपालिकेच्या एका भूखंडव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर होते. त्यांना पक्ष सोडायचा नव्हता. पण ईडीकडून अटक होण्याचीही भीती होती. तेवढी आपल्यात ताकद नाही, या कारवाईने मी मरून जाईन किंवा आत्महत्या करावी लागेल, अशी कैफियत त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली होती. पण त्यांच्याविरुद्धची सर्व प्रकरणे खोटी असल्याने त्यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Ravindra Waikar asks Uddhav Thackeray to stop ED action)

खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (17 मे 2025) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. त्यापैकीच एक रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामागच्या घडामोडींचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या 500 कोटी रुपयांच्या जोगेश्वरीतील भूखंडावर फाइव्ह स्टार हॉटेलचे बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. याशिवाय, मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट तसेच सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचाही ठपका ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊतांच्या रडावर अमित शहा, बाळासाहेब-पवारांच्या मदतीची करून दिली आठवण

हे सर्व कारस्थान भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे असल्याचा आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर वायकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. शिवसेनेच्या निष्ठावान नेत्यांपैकी एक असलेले वायकर आणि ठाकरे यांच्यात कौटुंबिक संबंध होते. पण, रायगड जिल्ह्यातील भूखंडावरील बंगले ठाकरे आणि वायकर कुटुंबाचे असल्याचे फेक नरेटिव्ह पसरवले गेले आणि या प्रकरणी खोट्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

या तसेच अन्य प्रकरणात रवींद्र वायकर यांना ईडी अटक करणार, असा धुरळा किरीट सोमय्या यांनी उडवला आणि त्या जाळ्यात वायकर फसले. रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही. केवळ राजकीय सूडापोटी आपली चौकशी सुरू आहे. जेलमध्ये जायची आपली ताकद नाही. मी मरून जाईन किंवा मला आत्महत्या करावी लागेल. मला विविध आजार असून शरीरात सहा स्टेंट आहेत. त्यामुळे मला अधिक चिंता आहे. मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू इच्छितो, असे रवींद्र वायकर त्यावेळी म्हणाल्याचे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.

शिवाय, पूर्वीपासून एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नसल्याने मला शिंदे गटात जायचे नाही. त्यामुळे आपल्यासाठी केंद्रात गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शब्द टाकावा, अशी इच्छा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती.. मात्र, याआधी संजय राऊत आणि अनिल परब यांच्यासाठी आपण कधी भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांसमोर झुकलो नाही; आता तुमच्यासाठी या नेत्यांना साकडे घातले तर, राऊत आणि परब यांच्या भावना दुखावल्या जातील. शिवाय, आता ज्या इतरांची चौकशी सुरू आहे, ते देखील तशीच अपेक्षा बाळगतील आणि मग तो पायंडाच पडेल, असा तर्क देत उद्धव ठाकरे यांनी याबाबत असमर्थता दर्शवली होती, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

त्यामुळे शिंदे गटात गेलेल्या वायकर यांना सर्व प्रकरणांमधून क्लीनचिट मिळाली. याचा अर्थ त्यांच्यावरील सर्व गुन्हे खोटे होते. त्यांनी पक्ष सोडावा म्हणून त्यांच्यावरील हा दबाव होता, असा निष्कर्षही संजय राऊत यांनी काढला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : तेव्हा त्यांनी एक फोन करायला हवा होता, राऊतांनी राज ठाकरेंविषयी बोलताना व्यक्त केली खंत



Source link

Comments are closed.