नोंद – स्व-विचारांचे संवर्धन

>> रविप्रकाश कुलकर्णी

एखाद्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपलं लक्ष वेधतं. त्यावरचं पोर्टेट पाहून पुस्तक हातात घेतलं.‘सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुन्शी’ हे ते पुस्तक. लेखक प्रसाद फाटक. प्रकाशक भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन. चित्रकार सारंग लेले यांनी हे मुखपृष्ठ केलेले आहे. पहिल्या पानावर कन्हैयालाल मुन्शी यांचा फोटो आहे. त्याखाली सुवचन आहे – ‘भारत पुन्हा एकदा विश्वगुरू म्हणून मान्यता पावेल. विश्वगुरू म्हणजे अशी महासत्ता, जी ‘वसुधैव कुटुंबकम’च्या आदर्शांचे मूर्तरूप आहे. कन्हैयालाल मुन्शी (30 डिसेंबर 1887.
8 फेब्रुवारी 1971)

सध्या विश्वगुरू होण्याची आपण स्वप्नं पाहत आहोत. हेच स्वप्न कन्हैयालाल मुन्शी यांनी कितीतरी वर्षांपूर्वी पाहिलं. प्रकाशक मनोगतात म्हणतात, ‘स्वातंत्र्योत्तर काळात वसाहतवाद्यांनी लादलेल्या विचारांपासून मुक्ती मिळवून हरवलेल्या सत्त्वांचा शोध शासक आणि नागरिक दोघांनीही घेण्याची आवश्यकता होती. अशा स्व-विचारांचे जागरण व्हावे, हिंदू प्राचीन मूल्ये आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे आणि राष्ट्र आपल्या प्राचीन मूल्यांच्या आधारावर, त्याची कालसुसंगत सांगड घालत उभे राहावे असे अनेकांना वाटत होते. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे कन्हैयालाल मुन्शी.’

चरित्र नायक कन्हैयालाल मुंशी म्हणजे स्वातंत्र्य सेनानी, लेखक, शिक्षण तज्ञ, इतिहासकार, कायदे तज्ञ, अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवणारे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. त्याचा सांगोपांग अभ्यास करून फाटक यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. पुस्तकात दोन विभाग केलेले असून पहिल्या विभागामध्ये त्यांची जडणघडण, महात्मा गांधींच्या प्रभावाने भारित राजकारणातील सहभाग, तिथले भलेबुरे अनुभव येतात.

भारताच्या राज्यघटनेच्या प्रमुख शिल्पकारांपैकी कन्हैयालाल मुन्शी हे एक होते. कॅबिनेट मंत्री, राज्यपालपद ते स्वतंत्र पक्षाची स्थापना आदी गोष्टीचा ऊहापोह पुस्तकात केला आहे. विभाग दोन म्हणजे राजकारणापलीकडचे मुन्शी. या विभागात हिंदू संघटनाबाबत त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळते. त्यांनी भारतीय विद्या भवनची स्थापना करून हिंदू धर्म, भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन, संस्कृत आणि संस्कृतीचा प्रसार केला. ‘आ नो भद्राः क्रतोवो यन्तु विश्वत’ हे भारतीय विद्या भवनचे बोधवाक्य आहे. म्हणजे उदात्त विचार हे सर्व दिशांनी आमच्याकडे येवोत. त्यानुसार संस्थेची वाटचाल आजही चालू आहे.

शब्दप्रभू प्रकरणात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जो शब्द प्रपंच केला त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. त्यांची राष्ट्रधर्म प्रेरित साहित्यिक कामगिरी अचंबित करणारी आहे. गुजराती कादंबऱया, प्रवास वर्णन, नाटकं, व्यक्तिचित्र संग्रह, निबंध लेखसंग्रह अश त्यांची 55 गुजराती, 39 इंग्रजी व 37 भाषांतरित झालेली पुस्तकं आहेत.

कन्हैया लाल मुंशी या माणसाबद्दल कुतूहल जागं करणारे हे चरित्र आहे.

Comments are closed.