BLOG : राखेतून उठलेल्या देशाची गोष्ट..!

1994 चे वर्ष आफ्रिकेसाठी दुःस्वप्न ठरले. आफ्रिकन देश रवांडामध्ये तुत्सी वंशाच्या लोकांची अमानुष कत्तल करण्यात आली. त्यांनीही काही प्रमाणात पलटवार केला आणि हुतु वंशाच्या लॊकांची हत्या केली. अधिकृत आकडेवारीनुसार आठ लाख लोक मारले गेले. लाखो घरे बेचिराख झाली. आधीच पिछाडीवर असलेला देश काही दशके मागे गेला. लोकांच्या मनात याच्या कडवट स्मृती तशाच राहिल्या. स्ट्रोम हा आताचा आफ्रिकेचा आघाडीचा कवी, गायक आहे. त्याचे रॅप आफ्रिकेत लोकप्रिय आहेत, त्याचे मूळ नाव पॉल हॅवर. तो बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथे जन्मलेला. त्याचे वडील रवांडन होते. तुत्सी वंशाचे होते. 1994 सालच्या जेनोसाईडमध्ये त्यांची निर्घृण हत्या झाली. 

वडिलांची हत्या झाली तेव्हा पॉल नऊ वर्षांचा होता. त्याच्या मनावर या गोष्टीचा गहिरा आघात झाला. तो यातून सावरू शकला नाही. व्यक्त होण्यासाठी त्याने कवितेचे माध्यम निवडले. त्या कवितांना त्यानेच संगीतबद्ध केलं. पुढे जे घडले तो मोठा इतिहास आहे. पॉल हॅवरचे स्टेजवरचे टोपण नाव स्ट्रोम आहे. तो जेनझी पासून गत पिढीचाही लाडका आहे. त्याचे पापा-ऊटे हे गाणं आफ्रिकेचे राष्ट्रगीतच झालेय जणू! 

पॉलने त्याच्या वडिलांसाठी हे गाणं लिहिलंय. ‘बाबा तुम्ही कुठे आहात?’ असा त्याचा ढोबळ अर्थ होतो. वडील अकाली गेल्याने आपण बापाच्या मायेला आणि सावलीला मुकलो आहोत, बाबा आता कुठेच नसतील का? ज्यांनी त्यांना मारले त्यांना त्यांचे वडील आठवत नसतील का, माझे वडील आता कुठे असतील,ते परत कधी येतील, असा या गीताचा अर्थ आहे. आफ्रिकेतून व्हायरल झालेल्या इंस्टाग्राम रिल्सवर या गाण्याचा अफाट मारा दिसून येतो. आफ्रिकन देश एक व्हावेत आणि एकच आफ्रिका देश व्हावा अशा अर्थाची चळवळही आता तिथे जोर धरतेय. विशेष गोष्ट म्हणजे ज्या रवांडाची जगभरात हेटाळणी होत होती त्याने प्रगतीची जी भरारी घेतली आहे ती विस्मयकारक आहे. 

रवांडा जलद आर्थिक परिवर्तन अनुभवत आहे, 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत त्यांची जीडीपी वाढ 11.8 % पर्यंत पोहोचली आहे, ज्याचे कारण औद्योगिक (15% वाढ) आणि सेवा क्षेत्रातील (10% वाढ) चांगली कामगिरी आहे. 2000 साला पासून, दरडोई उत्पन्न 50 % पेक्षा जास्त झाले आहे आणि गरिबीचे प्रमाण कमी झाले आहे, ज्यामुळे रवांडा ही आफ्रिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. रवांडाच्या प्रगतीचे कारण त्यांच्या एकात्मकतेच्या समतेच्या धोरणात आहे. 1994च्या नृशंस हत्याकांडानंतर सरकारने ओळखपत्रांसारख्या अधिकृत कागदपत्रांमधून वांशिक उल्लेख काढून टाकले आहेत आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन दिले आहे. त्यांचे राष्ट्रीय धोरण तिथले सर्व नागरिक फक्त "रवांडा" आहेत यावर जोर देते, त्यात भेदाला थारा नाही. जे वसाहतवादी आणि वसाहतोत्तर काळातील हुतू किंवा तुत्सी ओळखीला प्राधान्य देणाऱ्या रवांडामधला हा बदल क्रांतिकारी ठरलाय. 

देश प्रगतीच्या वाटेवर सुसाट सुटला असताना स्ट्रोमच्या गीताने आफ्रिकेला नव्या आशेच्या वाटेवर नेलेय आणि त्या सर्वांना आता खात्री वाटू लागलीय की आपण आपसात भांडण्याऐवजी एक होऊन आपल्या खंडाची, तमाम कृष्णवर्णीय देशांची एकजूट केली पाहिजे. रवांडाचा आदर्श घेण्यासाठी आफ्रिकन राष्ट्रे आराखडा तयार करत आहेत. त्यात डीआरसी काँगो देखील आहे जो विलक्षण खनिज समृद्ध देश आहे आणि त्यावर अनेक बड्या राष्ट्रांचा डोळा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आफ्रिकन इंस्टाग्रामवर स्ट्रोम सुपरहिट होतोय नि आफ्रिका त्याच्या तालावर नाचतेय हे दृश्य विलोभनिय आहे. या घडामोडी पाहता, आपण यापासून काही धडा घेणार आहोत का हा प्रश्न आवर्जून विचारावा वाटतो! आपल्या नेतृत्वाला अशी स्वप्ने पडत नसतील का?

समीर गायकवाड 

Comments are closed.