आरबीआयने एआय फ्रेमवर्कचा मसुदा जाहीर केला

आठ सदस्यीय समिती सहा महिन्यात देणार अहवाल : आर्थिक ठकसेनांवर नियंत्रण ठेवण्यात होणार मदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आरबीआयने एआय फ्रेमवर्कसाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती ‘एआय’चे संभाव्य धोके ओळखेल. 8 सदस्यांच्या या समितीचे अध्यक्षपदी प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये देबजानी घोष, बलरामन रवींद्रन, अभिषेक सिंग या तज्ञांचाही समावेश आहे. ही समिती केंद्र सरकारला आगामी सहा महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करणार आहे. याद्वारे बँकिंग क्षेत्रात ‘एआय’चा सकारात्मक वापर करता येईल आणि सायबर फसवणुकीवरही नियंत्रण येईल.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक आढावा बैठकीनंतर ‘एआय’वर तज्ञ समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याच घोषणेनुसार, आरबीआयने आपल्या सदस्यांचे तपशील आणि त्यांच्या जबाबदाऱ्या जाहीर केल्या आहेत. भारतीय वित्तीय क्षेत्रातील एआय मॉडेल्स आणि अॅप्लिकेशन्सच्या जबाबदार, नैतिक अवलंबनाशी संबंधित गव्हर्नन्स पैलूंच्या फ्रेमवर्कची शिफारस आरबीआयने केली आहे. त्यानुसार ‘एआय’शी संबंधित स्थापन करण्यात आलेली समिती आर्थिक क्षेत्राशी संबंधित बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या, वित्तीय-तंत्रज्ञान कंपन्यांसाठी एआय-संबंधित जोखमींसाठी मूल्यांकन, सेटलमेंट, मॉनिटरिंग फ्रेमवर्क आणि अनुपालन बिंदूंची शिफारस करणार आहे.

सायबर फसवणुकीवरही नियंत्रण

तंत्रज्ञानातील नाविन्याने आपले जीवन खूप सोपे केले आहे. तंत्रज्ञानातील दैनंदिन बदलांमुळे, आज आपण ऑनलाईन शॉपिंगपासून घरबसल्या जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व काही क्षणात करू शकतो. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवायचे झाले तरी, फक्त एका क्लिकवर पैसे सहज हस्तांतरित केले जाऊ शकतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन तंत्रज्ञानाने आपले जीवन जितके सोपे केले आहे तितकेच आपल्यासाठी समस्याही निर्माण केल्या आहेत. दररोज अनेक लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात आणि त्यांच्या खात्यातून लाखो कोटींची रक्कम क्षणार्धात गायब होते. अशा घटना टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना सुचविण्यासाठी ‘एआय’ आधारित नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Comments are closed.