आरबीआय आज रेपोवर निर्णय घेण्याचा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) बुधवारी आपले धोरणात्मक व्याजदर जाहीर करणार आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) द्वैमासिक बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्या बैठकीतील निर्णयांची घोषणा बुधवारी केली जाईल. सलग दोन दिवस चाललेल्या बैठकीत देशातील आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आता रेपो रेट 5.50 टक्के वर स्थिर ठेवावेत की त्यात कपात करावी याबाबत निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, एसबीआयच्या अहवालात 25 बेसिस पॉइंटची (बीपीएस) म्हणजेच पाव टक्क्यांची कपात सुचवण्यात आली आहे. मात्र, जागतिक पातळीवर अजूनही दोलायमान स्थिती असल्यामुळे आरबीआय सध्याचाच रेपोदर कायम ठेवू शकते, असे काही तज्ञांचे मत आहे. तथापि, आरबीआय आता अमेरिकेतील टॅरिफचे संकट आणि नियंत्रणात आलेली महागाई या दोन्ही बाजूंचा विचार करून कोणता मध्यवर्ती निर्णय घेते हे पहावे लागेल. चालू वर्षात फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात महागाई कमी होत असल्याने आरबीआयने तीनवेळा दर कमी केल्यामुळे एकंदर एक टक्क्याचा फरक पडला आहे. मात्र, आता आरबीआयने दर कमी केले तर बाजार तेजीत येऊ शकतो.
Comments are closed.