चिन्नास्वामी पुन्हा सज्ज! आरसीबी चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये इतके सामने….

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय चाहत्यांसाठी आयपीएल ही केवळ स्पर्धा नसून एक भावना आहे. गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आयपीएल 2026 पूर्वी आरसीबी चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यंदाचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरच होणार आहे. मागील वर्षी विजयानंतर साजऱ्या करण्यात आलेल्या जल्लोषावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर या मैदानावर एकही सामना आयोजित करण्यात आलेला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा हे ऐतिहासिक मैदान आयपीएलच्या रंगतदार वातावरणासाठी सज्ज झाले आहे.

नियमांनुसार गतविजेत्या संघाचा पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळवला जातो. त्यामुळे आरसीबीचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. एवढेच नव्हे, तर यंदाचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील याच मैदानावर खेळवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या हंगामात आरसीबी आपले पाच घरचे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. याशिवाय दोन सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित केले जाणार आहेत. बेंगळुरूतील हे मैदान नेहमीच उच्च धावसंख्या आणि रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध राहिले आहे.

दरम्यान, बेंगळुरूमध्ये सामने आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आरसीबी फ्रँचायझीने कर्नाटक सरकार, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि कर्नाटक पोलिसांचे आभार मानले आहेत. पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजना वेळेत पूर्ण केल्यामुळे बहुतांश सामने घरच्या मैदानावर खेळणे शक्य झाल्याचे फ्रँचायझीकडून सांगण्यात आले. यंदा विजेतेपदाचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आरसीबीसमोर असणार आहे.

Comments are closed.