RCB vs RR: 'हा' ठरला बंगळुरुच्या विजयाचा टर्निंग पाँईंट!

IPL 2025, RCB vs RR: एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) राजस्थान रॉयल्सवर (RR) 11 धावांनी विजय मिळवत घरच्या मैदानावरील पराभवांची मालिका अखेर खंडित केली. या विजयात मुख्य भूमिका बजावली ती ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडने, ज्याच्या निर्णायक स्पेलमुळे आरसीबीला महत्त्वाची बाजी मारता आली.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 205 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि फिल साॅल्टने आक्रमक सुरुवात दिली, तर शेवटच्या षटकांमध्ये टीम डेव्हिड आणि जितेश शर्मा यांच्या तडाखेबाज फटकेबाजी करत संघाला भक्कम स्कोरकडे नेलं.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनेही चिवट झुंज दिली. यशस्वी जयस्वालने अवघ्या 19 चेंडूत 49 धावांची झणझणीत खेळी करत आरसीबीच्या गोलंदाजांना हादरवलं. त्यानंतर ध्रुव जुरेलने संयमी पण प्रभावी खेळी करत 34 चेंडूत 47 धावा काढल्या आणि सामना राजस्थानच्या बाजूकडे झुकवला.

मात्र, नाट्यमय वळण आलं 19व्या षटकात. जोश हेजलवूडने जणू जादूच केली. अवघ्या 1 धावेत ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चरला बाद करत राजस्थानचा डाव जणू संपुष्टात आणला. अखेरच्या दोन षटकांत हेझलवूडने केवळ 7 धावा देत 3 बळी घेतले आणि सामन्याचं चित्रच बदलून टाकलं.

या विजयासह आरसीबीने केवळ दोन गुण मिळवले नाहीत, तर चाहत्यांच्या मनात पुन्हा आशा जागवली. हेजलवूडचा हा निर्णायक स्पेल आगामी सामन्यांसाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा ठरेल.

Comments are closed.