IPL 2026: मुंबई आणि चेन्नईला मागे टाकत बंगळुरूने रचला इतिहास! आयपीएलमध्ये 8 वेळा 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिला संघ

आयपीएल 2025 चा चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हा संघ आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु या संघाची गोलंदाजी युनिट देखील कोणापेक्षा कमी राहिलेली नाही. नुकतेच आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला केवळ 75 धावांत गुंडाळले आणि एक शानदार विजय नोंदवला. याचसोबत आरसीबीने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. आरसीबी आता आयपीएलच्या इतिहासात प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत रोखणारा संघ बनला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलच्या इतिहासात प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत रोखण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असून या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे. 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या आयपीएल 2026 च्या सामन्यात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar & Josh Hazlewood) आणि जोश हेझलवूड यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने प्रतिस्पर्धी संघाला केवळ 75 धावांवर ऑलआऊट केले. ही 8 वी वेळ होती, जेव्हा आरसीबीने एखाद्या संघाला 100 धावांच्या आत रोखले आहे.

5 वेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईच्या संघात जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा सारखे जागतिक दर्जाचे गोलंदाज राहिले आहेत, ज्यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. मुंबईने आतापर्यंत 7 वेळा प्रतिस्पर्धी संघाला 100 धावांच्या आत रोखण्याचा पराक्रम केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती सारख्या गोलंदाजांनी अनेकदा प्रतिस्पर्धी संघांना 100 धावांच्या आतच रोखले आहे. कोलकाताच्या संघाने हा पराक्रम 6 वेळा केला आहे. 2017 मध्ये केकेआरनेच आरसीबीला आयपीएलमधील सर्वात निचांकी 49 धावांवर ऑलआऊट करून इतिहास रचला होता.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स (CSK) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. चेपॉकच्या मैदानावर चेन्नईच्या फिरकी त्रिकुटाने अनेकदा विरोधी संघांना कमी धावसंख्येवर रोखले आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये एकूण 5 वेळा संघांना 100 धावांच्या आत ऑलआऊट करण्याचा पराक्रम केला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आपल्या स्फोटक फलंदाजीसोबतच घातक गोलंदाजीसाठीही ओळखली जाते. हैदराबादने 4 वेळा प्रतिस्पर्धी संघांना 100 धावांच्या आत ऑलआऊट करण्याचा पराक्रम केला असून ते या यादीत 5 व्या स्थानावर आहेत.

Comments are closed.