टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक समोर; मालिकेसाठी BCB कडून मोठे आश्वासन
टीम इंडियाचा बांगलादेश दौरा (Team india Bangladesh tour) आधी ऑगस्ट 2025 मध्ये होणार होता, परंतु राजकीय तणावामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता रिपोर्टनुसार, भारतीय संघ सप्टेंबर 2026 मध्ये 6 सामन्यांच्या मालिकेसाठी (3 वनडे आणि 3 टी-20) बांगलादेशचा दौरा करू शकतो. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप या मालिकेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) यांच्यातील ही मालिका यशस्वी करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पुढाकार घेतला आहे. बीसीबीच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष सय्यद इब्राहिम अहमद यांनी स्पष्ट केले आहे की, जर भारतीय संघ बांगलादेशला आला, तर त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि गरज पडल्यास अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, हा दौरा नियोजित वेळेनुसार पार पडेल आणि कोणतीही अडचण येणार नाही.
बीसीबीने नुकत्याच मागवलेल्या 2026-27 च्या घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ब्रॉडकास्टिंग अधिकारांच्या निविदांमध्ये भारत विरुद्धच्या या प्रस्तावित मालिकेचाही समावेश आहे. तसेच, सप्टेंबर 2026 च्या सुरुवातीच्या काळात भारतीय संघाचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने ठरलेले नाहीत, त्यामुळे ही मालिका होऊ शकते.
गेल्या वर्षभरात भारत आणि बांगलादेशच्या राजकीय संबंधांत तणाव निर्माण झाला होता, ज्याचा परिणाम खेळावरही झाला. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, आता बांगलादेशमधील नवीन सरकार आणि नवीन क्रिकेट प्रशासन पुन्हा एकदा भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. पण तरीही, अंतिम निर्णय आता बीसीसीआयच्या मंजुरीवर अवलंबून आहे.
Comments are closed.