धनत्रयोदशीला देशात विक्रमी व्यापार
तब्बल 1 लाख कोटींची खरेदी : आता पाडव्याच्या उलाढालीसाठी सज्जता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जीएसटी कमी केल्याने महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आल्यानंतर ऐन दिवाळी सणात देशभर विक्रमी खरेदी-विक्री व्यवहार सुरू आहेत. यंदाच्या दीपोत्सवादरम्यान शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर 1 लाख कोटींच्या व्यवहाराचा नवीन खरेदी विक्रम प्रस्थापित झाला. आता बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दीपावली पाडव्याच्या मुहुर्तावर मोठी उलाढाल करण्यासाठी व्यापारी आणि ग्राहकवर्ग सज्ज झाला आहे. बाजारातील या तेजीमुळे सरकारी गंगाजळीतही मोठी वाढ अपेक्षित आहे.
यावर्षी धनत्रयोदशीला झालेल्या खरेदीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) नुसार, धनत्रयोदशीला भारतात सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. त्यापैकी 60 हजार कोटी रुपयांची सोने आणि चांदीचीच खरेदी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा सुमारे 25 टक्के जास्त असल्याचे ‘सीएआयटी’ने म्हटले आहे.
धनत्रयोदशीची पर्वणी साधत अनेक लोक सोने, चांदी, भांडी आणि इतर वस्तू खरेदी करतात. हा दिवस खरेदीसाठी एक शुभ काळ मानला जातो. या वस्तू समृद्धीचे प्रतीक असल्याने ग्राहक राजा त्यांची खरेदी करत असतो. ‘सीएआयटी’ च्या मते, धनत्रयोदशीला भांडी आणि स्वयंपाकघरातील वस्तूंची विक्री 15,000 कोटी रुपयांची झाली. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचीही विक्री अंदाजे 10,000 कोटी रुपयांची झाली. 3,000 कोटी रुपयांच्या सजावटीच्या वस्तू, दिवे आणि पूजा साहित्याची विक्री झाली. 12,000 कोटी रुपयांचे सुकामेवा, मिठाई, फळे, कापड आणि वाहने विकली गेल्याची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत वाहनांच्या खरेदीमध्येही मोठी वाढ झाल्याची माहिती कंपन्यांकडून उपलब्ध झाली आहे.
सोने-चांदीकडे वाढता कल
भारतीयांनी धनत्रयोदशीला 60,000 कोटींचे सोने आणि चांदी खरेदी केली. हे व्यवहार गेल्या वर्षीपेक्षा 25 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या दोन दिवसांत दागिन्यांच्या बाजारात अभूतपूर्व गर्दी दिसून आली आहे. एकट्या दिल्लीतील विक्री 10,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचे ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले. उच्च किमती असूनही स्मार्ट शॉपिंग आणि विवाहाच्या खरेदीमुळे ग्राहकांचा कल सोन्या-चांदीकडे अधिक दिसून येत आहे. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी राहिली आहे.
किमती वाढल्या, तरीही…
चालू वर्षात सोन्याच्या किमतीत 53,400 म्हणजेच जवळपास 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 76,162 होती, जी आता वाढून 1,30,00 वर पोहोचली आहे. या काळात चांदीच्या किमतीतही 83 हजार रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी एक किलो चांदीची किंमत 86,017 होती. हा दर आता वाढून 1,69,230 प्रतिकिलो झाला असूनही ग्राहकांचा खरेदीचा ओघ कमी झालेला दिसत नाही.
Comments are closed.