बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात विक्रमी मतदान
जवळपास 65 टक्क्यांवर मतदान : एकंदर निवडणूक शांततेत : अनेक उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद
वृत्तसंस्था/पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यात मतदानाचा विक्रम घडला आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदानाची अधिकृत वेळ संपली, तेव्हा 64.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. रांगेत उभे असणाऱ्या मतदारांना सहा नंतरही मतदानाची संधी मिळाली असल्याने मतदानाचा अंतिम टक्का यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती गुरुवारी संध्याकाळी साडेसातला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या टप्प्यात बिहार विधानसभेच्या एकंदर 243 जागांपैकी 121 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. हे मतदारसंघ 13 जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहेत. या मतदानानंतर अनेक महत्वाच्या मतदारसंघांमधील महनीय उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले आहे. या निवडणुकीत मुख्य चुरस सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी महागठबंधन यांच्यात आहे. काही नवे पक्षही त्यांचे भाग्य आजमावत असून निर्दलीयांची संख्या मोठी असल्याचे दिसत आहे.
मतदानाचा अडीच दशकांमधला विक्रम
या प्रथम टप्प्यात जितके मतदान झाले आहे. तितके या मतदारसंघांमध्ये 2000 पासून झाले नव्हते. त्यामुळे हा एक नवा विक्रमच आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या माहितीनुसार मतदानाची सरासरी टक्केवारी 64.46 टक्के इतकी होती. मात्र, अनेक मतदारकेंद्रांवर या वेळेच्या नंतरही मतदारांचा मोठ्या रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे अंतिम टक्केवारी तीन ते चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अंतिम टक्केवारी आज शुक्रवारी सकाळी हाती येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांचे लक्ष
गुरुवारची मतदानप्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेवर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांचे सूक्ष्म लक्ष होते. ते वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत होते, तसेच सर्व घडामोडींची माहिती घेत होते. मतदानाच्या टक्केवारीवरही त्यांचे विशेष लक्ष होते. सुरक्षा व्यवस्था, मतदारांसाठीच्या सुविधा आदींची माहितीही त्यांना देण्यात येत होती, असे स्पष्ट करण्यात आले.
महिलांचे मतदान अधिक प्रमाणात
या प्रथम टप्प्यात मतदारांची संख्या 3 कोटी 75 लाखाच्या आसपास आहे. पुरुष मतदारांची संख्या साधारणत: 1 कोटी 98 लाख असून महिला मतदारांची संख्या साधारणत: 1 कोटी 76 लाख इतकी आहे. गेल्या निवडणुकीप्रमाणेच याहीवेळी मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.
सम्राट चौधरी यांनी मानले आभार
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी यांनी मतदारांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. मतदारांची संख्या आणि त्यांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षाही मोठा आहे. ही बाब लोकशाहीसाठी आनंददायी आहे. या प्रथम टप्प्यातील 121 जागांपैकी मोठ्या बहुसंख्येने जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळतील, असा विश्वास मला वाटतो. बिहारमध्ये पुन्हा आमच्याच आघाडीचे सरकार स्थापन होईल, यावर या टप्प्यातील मतदानाने आपली मुद्रा उमटविली असून याचे प्रत्यंतर 14 नोव्हेंबरला येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनेक महत्वाचे उमेदवार
या टप्प्यात अनेक महत्वाचे उमेदवार संघर्षात आहेत. यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्या उमेदवारांचा समावेश आहे. बिहारच्या चौदा मंत्र्यांचा त्यांच्यात समावेश आहे. तसेच महागठबंधनच्या तीन महत्वाच्या उमेदवारांचा समावेश आहे. मतगणना पुढच्या शुक्रवारी 14 नोव्हेंबर या दिवशी होणार आहे, विद्यमान विधानसभेचा कालावधी 22 नोव्हेंबरपर्यंत आहे.
महत्वाच्या जिल्ह्यांमधील 5 पर्यंतचे मतदान
- बेगुसराय-67.32 टक्के
- बक्सर-55.10 टक्के
- दरभंगा-58.38 टक्के
- गोपालगंज-64.96 टक्के
- पाटणा-55.02 टक्के
- शेखुपुरा-52.36 टक्के
- वैशाली-59.45 टक्के
Comments are closed.