रायगड जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’, तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी; शनिवारी अति मुसळधार पावसाची शक्यता

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शुक्रवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाचा हाच जोर शनिवारीही कायम राहणार असून रायगड जिल्ह्याला प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने रेड अलर्ट जारी केला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा प्रभाव संपूर्ण कोकणात दिसणार आहे. यामुळे रायगड आणि रत्नागिरीला 15 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

16 ऑगस्ट रोजी मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव रायगड जिल्ह्यावर जास्त असणार असून त्यामुळे रायगडला रेड अलर्ट, तर संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

17 तारखेला संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती, हवामान विभागाने दिली.

Comments are closed.